भारताचा जपानवर मोठा विजय
वृत्तसंस्था, जालंधर
येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान भारताने जपानचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा तिसरा सामना होता.
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने या सामन्यात वेगवान आणि आक्रमक खेळावर भर दिला होता. भारतीय पुरुष हॉकी संघाने यापूर्वी ही स्पर्धा 5 वेळा जिंकली आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय हॉकी संघाने जपानला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. सामन्यातील 11 व्या मिनिटाला भारताचे खाते अभिषेकने उघडले. त्यानंतर 15 व्या मिनिटाला जपानने आपले खाते पेनल्टी स्ट्रोकवर उघडल्याने मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तरार्धात भारतीय आघाडी फळीतील खेळाडुंनी पाठोपाठ आक्रमणे करत जपानच्या बचाव फळीवर दडपण आणण्यास यश मिळविले आणि त्यांनी आणखी 3 गोल नोंदवून जपानचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले.
