For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रगत अर्थव्यवस्थांच्या दिशेनं भारतीयांची धाव !

06:59 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रगत अर्थव्यवस्थांच्या दिशेनं भारतीयांची धाव
Advertisement

काम-व्यवसायानिमित्त देश सोडून परराष्ट्रांच्या दिशेनं धावणाऱ्या अन् पुढं तिथंच स्थायिक होणं पसंत करणाऱ्या भारतीयांचा प्रवाह मागील काही वर्षांत वाढत चालला असून यात जास्त ओढा दिसतोय तो स्वाभाविकपणे प्रगत अर्थव्यवस्थांकडे...या देशांच्या ‘ओईसीडी’ या संघटनेनं हल्लीच प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून हे चित्र अन् त्यात झालेली वृद्धी स्पष्टपणे दिसतेय...अशा विविध राष्ट्रांत मागणी असलेल्या भारतीयांमध्ये अग्रक्रमांक लाभलाय तो आपल्या डॉक्टर नि परिचारिकांना... 

Advertisement

‘ओईसीडी’...म्हणजेच ‘ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’...अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास विश्वातील प्रगत अर्थव्यवस्था आणि त्यांच्यात समावेश अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या 38 राष्ट्रांचा...संघटनेनं काही काळापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केलाय अन् त्यात म्हटलंय की, त्या देशांचं सर्वांत जास्त नागरिकत्व मिळविलंय ते भारतीय व्यक्तींनी...अहवालाचं नाव...‘इंटरनॅशनल मायग्रेशन आऊटलूक, 2025’..त्यात देण्यात आलीय ती 2023 सालची आकडेवारी व अहवाल म्हणतोय की, तब्बल 2 लाख 25 हजार भारतीय नागरिकांनी ‘ओईसीडी’च्या दिशेनं मोर्चा वळवून तेथील नागरिकत्व मिळविलंय...

अन्य कुठल्याही राष्ट्राला हे साधलेलं नाहीये...2023 सालचा विचार केल्यास एकूण 28 लाख लोकांनी ‘ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ समूहाचं नागरिकत्व स्वीकारलंय. 2022 मध्ये हा आकडा 27 लाख 70 हजार इतका होता...भारतानंतर क्रमांक मिळविलाय तो 1 लाख 32 हजार व्यक्तींसह फिलिपाईन्सनं, तर तिसऱ्या स्थानावरील चीननं 96 हजार असा आकडा नोंदविलाय...2022 अन् 2023 या दोन वर्षांत आपल्या नागरिकांनी जोरदार मुसंडी मारली. भारतीयांचा ओढा सर्वांत जास्त प्रमाणात आहे तो मध्यंतरी संबंध बिघडलेल्या व आता नातं सुधारण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणाऱ्या कॅनडाकडे. 2022 मधील 59 हजार 405 वरून 2023 मध्ये ती संख्या पोहोचली 78 हजार 487 वर. 2013 मध्ये हा आकडा होता 15 हजार 388...

Advertisement

संघटनेला वाटतंय की, ‘ओईसीडी’ राष्ट्रांच्या धोरणांची स्थिरता, नागरिकत्व देण्याच्या बाबतीत लवकर पूर्ण येण्यात येणारे सोपस्कार आणि सुमारे दशकभरापूर्वी  तिथं गेलेल्या नागरिकांची भरभराट यामुळं भारतीय त्या देशांत जाण्यास फार मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत...तथापि, विश्लेषकांनी 2024 मध्ये या संख्येत घट झालेली दिसेल असं अनुमान वर्तविलंय. कॅनडाचंच उदाहरण घेतल्यास तिथं महागाई वाढलीय नि नवीन घरांची संख्या घटल्यानं लोक हैराण झालेत...अहवाल सांगतोय की, आपल्या देशातील नागरिकांनी फक्त कॅनडाच्या दिशेनं पलायन केलेलं नाहीये...

2023 मध्ये सुमारे 52 हजार 360 व्यक्तींनी नागरिकत्व स्वीकारलं ते अमेरिकेचं (मात्र आता चंचल डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत ते अजिबात शक्य नाही). त्यापूर्वीच्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये 66 हजार 670 भारतीयांनी महासत्तेला पसंत केलं होतं...40 हजार 361 लोकांनी हात पकडला तो ऑस्ट्रेलियाचा (2022 साली 30 हजार 160)...थोडक्यात सांगायचं झाल्यास 2023 मध्ये कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या तीन देशांतच आसरा घेतला तो 1 लाख 71 हजार भारतीयांनी. एकूण स्थलांतरामध्ये हे प्रमाण 76 टक्के...

Advertisement
Tags :

.