इराणमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांची सुटका
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेल्या महिन्यात इराणमध्ये बेपत्ता झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. ही घोषणा भारतातील इराणच्या दूतावासाकडून बुधवारी करण्यात आली. इराणची राजधानी तेहरान येथील पोलिसांनी या तीन भारतीयांची सुटका केली असून लवकरच त्यांना भारताकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे. जसपाल सिंग, हुशनप्रीत सिंग आणि अमृतपाल सिंग अशी सुटका झालेल्या नागरीकांची नावे आहेत. ते इराणमधून ऑस्टेलियात जाण्याच्या प्रयत्नात होते. एका बेकायदेशीर मध्यस्थाने त्यांना ऑस्ट्रेलियात मोठ्या वेतनाचे काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रथम या मध्यस्थाने त्यांना इराणमध्ये जाण्याची सूचना केली होती. त्यानुसार ते इराणला गेले. तेथे या मध्यस्थाच्या कंपनीने त्यांना दडवून ठेवल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या भारतातील नातेवाईकांनी केली. भारताने आपल्या इराणमधील दूतावासाच्या माध्यमातून हा मुद्दा इराणच्या प्रशासनाकडे लावून धरला होता. अखेर इराणच्या पोलिसांनी या बनावट प्रवासी कंपनीच्या कार्यालयांवर धाडी टाकून तेथे डांबलेल्या या तीन भारतीयांची सुटका मंगळवारी केली. नंतर भारताला या संबंधी माहिती देण्यात आली आहे. आता भारत सरकार त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. इराणच्या पोलिसांकडून या तिघांची चौकशी केली जात असून ती पूर्ण झाल्यानंतर त्यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.