दुसऱ्यांच्या चाकरीसाठीच भारतीय!
काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे वाद : भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या एका नव्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा अडचणीत सापडला आहे. भारताने इतरांच्या चाकरीसाठीच युवांची मोठी फौज निर्माण केली आहे. युवांची ही फौज भारतासाठी नव्हे तर विदेशींसाठी काम करते असे वादग्रस्त वक्तव्य पित्रोदा यांनी केले आहे.
1.5 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाकडे स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम देखील नाही, ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले आहे. पित्रोदांच्या या टिप्पणीनंतर भाजपने त्यांना लक्ष्य करत भारताची निंदा केल्याचा आरोप केला आहे.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेत्याने विदेशी कंपन्यांमधील भारतीयांच्या संख्येचा उल्लेख केला. भारताने स्वत:च्या शिक्षण संस्थांद्वारे युवा प्रतिभेचा मोठा आधार तयार केला आहे. परंतु भारतातच नव्या संशोधनासाठी याचा लाभ उचलण्यात सरकार पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. आम्ही मोठ्या युवा प्रतिभेची निर्मिती केली आहे, परंतु ही अपरिपक्व आहे. या प्रतिभेने भारताला नव्हेतर जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रोग्रामिंग, कायदा, उद्योग, लॉजिस्टिक्स, नवोन्मेष, बँकिंगमध्ये मदत केली आहे. या प्रतिभेच्या बळावर भारताने जागतिक स्तराची उत्पादने निर्माण केली नाहीत, तर या प्रतिभेचा वापर इतरांच्या सेवेसाठी केल्याचा दावा पित्रोदा यांनी केला आहे.
भारताने स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केले नाही तसेच मायक्रोसॉफ्टसारखी मोठी कंपनी उभारता आलेली नाही. आम्ही मोबाइल फोनसाठी स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम देखील निर्माण करू शकलो नाही. आम्ही खरोखरच ामच्या युवा प्रतिभेचा वापर इतरांच्या सेवेसाठी केल्याची टिप्पणी पित्रोदा यांनी केली.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून आलेल्या टिप्पणीवर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘लष्कर-ए-काँग्रेस’च्या मुख्य सल्लागाराने पुन्हा एकदा असत्य बोलू भारताची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. एआय समिटमध्sय काँग्रेसच्या टॉपलेस अॅक्टनंतर लष्कर-ए-काँग्रेसचे मुख्य सल्लागार सॅम पित्रोदा मैदानात आहेत. एक एक करून पुन्हा भारताला बदनाम करण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे. अंकल सॅम खोटं बोलून भारताची चेष्टा करतात असा आरोप भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. तसेच भाजप प्रवक्त्याने यावेळी भारतात विकसित ऑपरेटिंगसिस्टीम बॉस लिनक्स, माया ओएस, प्राइमओएस, भारओएस, इंडस ओएस अणि एनएक्सटीक्वांटम ओएसचे उदाहरण दिले.