भारतीय युवा संघाची विजयी सलामी
वृत्तसंस्था / लंडन
भारत आणि यजमान इंग्लंड 19 वर्षांखालील वयोगटातील संघामध्ये सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने विजयी सलामी देताना इंग्लंडचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय युवा संघातील वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 48 धावा झोडपल्या.
या सामन्यात इंग्लंड युवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 42.2 षटकात सर्वबाद 174 धावा जमवित भारताला 175 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारतीय युवा संघाने 24 षटकात 4 बाद 178 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला.
इंग्लंडच्या डावामध्ये रॉकी फ्लिंटॉफने 90 चेंडूत 56, इसाक मोहम्मदने 28 चेंडूत 42 धावा जमिवल्या. भारतीय युवा संघातील कनिष्क चौहानने 20 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये कर्णधार आयुष म्हात्रे आणि सूर्यवंशी यांनी सलामीच्या गड्यासाठी 71 धावांची भागिदारी केली. कर्णधार म्हात्रेने 30 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. म्हात्रे 8 व्या षटकात बाद झाला. अभिज्ञान कुंडूने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 45 धावा जमविल्या. इंग्लंड संघातर्फे फ्रेंचने 46 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 42.2 षटकात सर्वबाद 174 (फ्लिंटॉफ 56, इसाक मोहम्मद 42, कनिष्क चौहान 3-20), भारत 24 षटकात 4 बाद 178 (वैभव सूर्यवंशी 48, अभिज्ञान कुंडू नाबाद 45, आयुष म्हात्रे 21, फ्रेंच 2-46)