भारतीय युवा संघाचा कांगारुवर मालिका विजय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील वयोगटात खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. पुडुचेरी येथे सोमवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ‘सामनावीर’ साहील पारखच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया युवा संघाचा डाव 49.3 षटकात 176 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 22 षटकात 1 बाद 177 धावा जमवित ऑस्ट्रेलियाचा 9 गड्यांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये शेरीफने 61 चेंडूत 2 चौकारांसह 39, होवेने 48 चेंडूत 2 चौकारांसह 28, यंगने 3 चौकारांसह 19, कर्टनने 17, कर्णधार पीकने 15, हॉब्जने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. भारतातर्फे समर्थ नागराज, मोहम्मद इनान, किरण चोरमाळे यांनी प्रत्येकी 2 तर गुहा आणि हार्दिकराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 1 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये सलामीचा रुद्र पटेल तिसऱ्या षटकात झेलबाद झाला. त्याने 9 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. त्यानंतर साहील पारख आणि अभिज्ञान कुंडू यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 153 धावांची दीडशतकी भागिदारी करत आपल्या संघाच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला. पारखने 75 चेंडूत 5 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 109 तर कुंडूने 50 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 53 धावा झळकविल्या. या मालिकेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाचा 7 गड्यांनी पराभव केला होता. आता या मालिकेतील तिसरा सामना येत्या गुरुवारी खेळविला जाईल. या मालिकेनंतर उभय संघात 2 सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका चेन्नईत 30 सप्टेंबरपासून खेळविली जाईल.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया 49.3 षटकात सर्वबाद 176 (शेरीफ 39, होवे 28, पीके 15, यंग 19, क्युरेटेन 17, हॉब्ज 16, अवांतर 4, नागराज, इनान, चोरमाळे प्रत्येकी 2 बळी, गुहा आणि हार्दिक राज प्रत्येकी 1 बळी), भारत 22 षटकात 1 बाद 177 (साहील पारख नाबाद 109, रुद्र पटेल 10, ए. पुंडू नाबाद 53, अवांतर 5, होकेस्ट्रा 1-25)