भारतीय युवा संघाचा 211 धावांनी विजय
वृत्तसंस्था / शारजा
येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मद अमानचे नाबाद शतक, कार्तिकेय व आयुष म्हात्रे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय युवा संघाने दुबळ्या जपानचा 211 धावांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकात 6 बाद 339 धावा जमविल्या. त्यानंतर जपानने 50 षटकात 8 बाद 128 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला.
भारताच्या डावामध्ये कर्णधार मोहम्मद अमानने 118 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 122, आयुष म्हात्रेने 29 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 54, के. पी. कार्तिकेयने 49 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 57, सुर्यवंशीने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23, सिद्धार्थने 48 चेंडूत 2 चौकारांसह 35, निखिल कुमारने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. हार्दीक राजने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 25 धावा केल्या. भारताच्या डावामध्ये 8 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. जपानतर्फे किफेर लेक आणि हुगो केलीने प्रत्येकी 2 गडी तर चार्लस हिंजे आणि आरव तिवारी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जपानच्या डावामध्ये सलामीच्या हुगो केलीने 111 चेंडूत 6 चौकारांसह 50, चार्जस हिंजेने 68 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 35 तर निहार परमारने 31 चेंडूत 14 धावा जमविल्या. जपानच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जपानच्या डावात 9 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे चेतन शर्मा, हार्दिक राज आणि के. पी. कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 तर गुहाने 1 गडी बाद केला. या स्पर्धेत भारतीय युवा संघाला सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारताचा प्राथमिक गटातील शेवटचा सामना संयुक्त अरब अमिरातबरोबर (युएई) बुधवार दि. 4 डिसेंबरला खेळविला जाणार आहे. या दोन गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 6 डिसेंबरला तर अंतिम सामना 8 डिसेंबरला खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक: भारत 50 षटकात 6 बाद 339 (मोहम्मद अमान नाबाद 122, आयुष म्हात्रे 54, वैभव सूर्यवंशी 23, सिद्धार्थ 35, कार्तिकेय 57, निखिलकुमार 12, हादॅक राज नाबाद 25, अवांतर 10, किफेर यामामोटो-लेक आणि केली प्रत्येकी 2 बळी, हिंजे आणि तिवारी प्रत्येकी 1 बळी), जपान 50 षटकात 8 बाद 128 (केली 50, परमार 14, हिंजे 35, अवांतर 10, चेतन शर्मा, हा|िदक राज, कार्तिकेय प्रत्येकी 2 बळी, गुहा 1-9).