भारतीय युवा संघाकडून ऑस्ट्रेलिया युवा संघाचा ‘व्हाईटवॉश’
वृत्तसंस्था/पुडुचेरी
तीन सामन्यांच्या वनडे क्रिकेट मालिकेत 19 वर्षांखालील भारतीय युवा क्रिकेट संघाने गुरुवारी झालेल्या शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 7 धावांनी पराभव केला. भारतीय युवा संघाने ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार ऑलिव्हर पीके ने शानदार शतक नोंदवित ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला. यावनडे मालिकेत भारतीय युवा संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 7 गड्यांनी तर दुसऱ्या सामन्यात 9 गड्यांनी दणदणीत पराभव करुन विजयी आघाडी घेतली होती. गुरुवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांकडून सुमारे 640 धावा नोंदविल्या गेल्या. भारतीय युवा संघातर्फे रुद्र पटेल, कर्णधार मोहम्मद अमान यांनी शानदार अर्धशतके झळकविली. तर पांगलियाने 46 धावांचे तसेच चोरमलेने 30 आणि हार्दिक राजने 30 धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियन युवा संघाच्या डावामध्ये कर्णधार ऑलिव्हर पीके आणि स्टिव्हन होगेन यांनी शानदार शतके झळकविली पण ती वाया गेली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय युवा संघाने 50 षटकात 8 बाद 324 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये रुद्र पटेलने 81 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 77, पांगलियाने 47 चेंडूत 5 चौकारांसह 48, कर्णधार मोहम्मद अमानने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 71, किरण चोरमाळे 32 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 30, हार्दीक राजने 18 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30, चेतन शर्माने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 18 धावा जमविल्या. साहील पारेखने 24 चेंडूत 4 चौकारांसह 20 धावा केल्या. भारतीय युवा संघाच्या डावामध्ये 9 षटकार आणि 29 चौकार नेंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे ओकॉनरने 84 धावांत 4 तर रॅनेल्डोने 66 धावांत 2, होकेस्ट्रा आणि होवे यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकात 8 बाद 324 (मोहम्मद अमान 71, रुद्र पटेल 77, हार्दीक राज 30, हर्वंश पांगलिया 46, किरण चोरमाळे 30, चेतन शर्मा नाबाद 18, अवांतर 20, ओकॉनर 4-84, रॅनाल्डो 2-66, होकेस्ट्रा आणि होवे प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 50 षटकात 7 बाद 317 (पीके 111, होगेन 104, बज 32, ओकॉनर 35, होवे 10, अवांतर 10, गुहा 2-40, चोरमाळे 2-59, हार्दीक राज 3-55)