भारतीय युवा हॉकी संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना 3-3 बरोबरीत
वृत्तसंस्था/ जोहोर बाहरू (मलेशिया)
भारतीय युवा संघाने उल्लेखनीय संयम दाखवताना शुक्रवारी येथे सुलतान ऑफ जोहोर चषकात न्यूझीलंडविरुद्धचा सामना 3-3 असा बरोबरीत सोडवून त्यांचा साखळी टप्पा पूर्ण केला. गुरज्योत सिंग (6 वे मिनिट), रोहित (17 वे मिनिट) आणि तालम प्रियोबर्टा (60 वे मिनिट) यांनी भारताचे गोल केले, तर न्यूझीलंडचा ड्रॅग फ्लिकर जॉन्टी एल्म्स (17 वे, 32 वे आणि 45 वे मिनिट) याने हॅट्ट्रिक केली.
भारत 10 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर असला, तरी अंतिम फेरीत प्रवेश करण्याबाबत त्यांचे भवितव्य ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचे अनुक्रमे जपान आणि मलेशियाविऊद्धचे सामने ठरवतील. शुक्रवारच्या सामन्यात 6 व्या मिनिटाला गुरज्योतने केलेल्या सुरेख गोलाद्वारे भारताने दमदार सुऊवात केली. गुरज्योतच्या गोलवरील पहिला फटक्यासाठी सुखविंदरने साहाय्य केले. तो गोलरक्षकाने अडविल्यानंतर परतलेल्या चेंडूवरील दुसऱ्या प्रयत्नात त्याने कुशलतेने चेंडू जाळ्यात सारला आणि भारताला 1-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
दोन लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळविल्यानंतर 8 व्या मिनिटाला भारताला आघाडी वाढवण्याची संधी होती, परंतु न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने उत्कृष्टरीत्या बचाव केला. 17 व्या मिनिटाला एल्म्सने उत्कृष्ट मैदानी गोल करून न्यूझीलंडला बरोबरी साधून दिली. पण भारताने प्रत्युत्तर देण्यात तत्परता दाखवली आणि रोहितने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून 2-1 अशी आघाडी वाढविली. दोन्ही संघ खूप गतीने खेळले आणि दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताने अनेक पेनल्टी कॉर्नर मिळविले असले, तरी त्यांना यश मिळू शकले नाही.
त्यातच न्यूझीलंडने तिसऱ्या सत्राची सुऊवात एल्म्सच्या उत्कृष्ट पेनल्टी कॉर्नर रूपांतरणाने केली. एल्म्सने 45 व्या मिनिटाला हॅट्ट्रिक करून न्यूझीलंडला 3-2 ने आघाडीवर नेले. चौथ्या सत्रामध्येही पेनल्टी कॉर्नरच्या रूपांतराच्या बाबतीत भारताची समस्या कायम राहिली आणि त्यांनी 46 व्या मिनिटाला संधी गमावली. दुसरीकडे, न्यूझीलंडने पुढच्या काही मिनिटांत शानदार प्रतिहल्ले केले, पण भारतीय बचावफळीने त्यांची डाळ शिजू दिली नाही.
सामना संपण्यास 90 सेकंद शिल्लक असताना भारताला बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. यावेळी त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला असता प्रियोबार्ताने त्याचे यशस्वीरीत्या रुपांतर केले आणि रोमहर्षक सामना 3-3 असा बरोबरीत संपवला.