भारतीय युवा फुटबॉल संघ जाहीर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 5 मेपासून सुरू होणाऱ्या पुरूषांच्या एएफसी 17 वर्षांखालील वयोगटातील आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी शुक्रवारी 23 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला.
भारतीय फुटबॉल संघ सध्या डोहामध्ये असून त्यांनी कतारबरोबर 2 मित्रत्वाचे सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने बरोबरीत राहिले. आता ते रविवारी जेद्दाहला रवाना होतील. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश आहे. या गटामध्ये ऑस्ट्रेलिया आणि उझ्बेक यांचाही सहभाग आहे. या गटातील चौथा संघ उत्तर कोरियाचा समावेश होता. पण त्यांनी या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. त्यामुळे या गटात केवळ तीन संघ राहतील. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना 6 मे रोजी ऑस्ट्रेलियाबरोबर तर दुसरा सामना 10 मे रोजी उझ्बेकबरोबर होईल.
भारतीय फुटबॉल संघ : गोलरक्षक- अलोक निशाद, एम. बारुआ, राजरुप सरकार, बचावफळी-अभिषेक कुमार मोंडल, इंद्रराणा मगर, कोरोयु मेताई, लॉमेसंगझुला, लेसव्हीन रिबेलो, मोहम्मद अमिन बीन, शुभम पुनिया, मध्यफळी-डी. गंगटे, डॅनी सिंग वेंगथेम, डायमंड सिंग थोकचोम, मुसा आशिक सोफी, नितीशकुमार मेताई, आघाडी फळी-आदिल अमन, अझलन शहा, गुणेलिबा, एच. सेरम, रेहान अहमद, राज सिंग वाहेंगबाम, वॉशिंग्टन सिंग आणि युवराज कदम.