अमेरिकेत मित्राला वाचविताना भारतीय युवकाचा मृत्यू
न्यूयॉर्क :
अमेरिकेच्या एका तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या भारतीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. युवक स्वत:च्या मित्रांसोबत तलावात उतरला होता, तेथे त्याचा एक सहकारी बुडू लागल्यावर त्याला वाचविण्यासाठी भारतीय युवकाने त्वरित पाण्यात उडी घेतली. भारतीय युवकाने मित्राचा जीव वाचविला, परंतु तो स्वत: पाण्यातून बाहेर पडू शकला नाही. करनालच्या विकासनगरचा रहिवासी अर्शदीप याचा यात मृत्यू झाला आहे. अर्शदीप यांच्या परिवाराने त्याला विदेशी पाठविण्यासाठी सुमारे 45 लाख रुपये खर्च केले होते. अर्शदीप अमेरिकेत स्वत:च्या नातेवाईकांसोबत राहत होता. तसेच तेथील एका स्टोअरमध्ये काम करत होता. अर्शदीप पोहू शकत होता, मित्राला वाचविताना प्रचंड दमछाक झाल्याने तो बुडाला असे सांगण्यात येत आहे. अर्शदीपचा मृतदेह आता भारतात आणण्यासाठी त्याचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. कुटुंबीयांनी हरियाणा सरकार आणि विदेश मंत्रालयाशी संपर्क साधत मदतीची विनंती केली आहे.