आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ जाहीर
वृत्तसंस्था, लखनौ
आगामी होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय पुरूष मल्ल संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये भारतीय मल्ल दीपक पुनियाची बढती 97 किलो वजन गटात करण्यात आली आहे. तर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल अमन सेहरावत तसेच सुजित कालकल यांनी मात्र पुरूषांच्या फ्रिस्टाईल संघामध्ये आपले स्थान राखले आहे.
रविवारी येथे आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. यापूर्वी दीपक पुनिया 86 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करत होता. पण आता त्याला आशियाई स्पर्धेसाठी 97 किलो वजन गटात उतरावे लागणार आहे. दीपकची बरीच आंतरराष्ट्रीय कुस्ती कारकीर्द 86 किलो वजन गटातच होती. आता 26 वर्षीय दीपक पुनिया 97 किलो वजन गटात खेळेल. या निवड चाचणीपूर्वी आपण 86 किलो वजन गटासाठी सराव करत होतो. पण गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मी 92 किलो गटात लढती केल्या. दुखापतीमुळे मला मार्गदर्शनाची संधी मिळू शकली नाही, असेही पुनियाने म्हटले आहे.
गोंडा येथे झालेल्या खुल्या मानांकन कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. गोंडातील स्पर्धेत पदक विजेत्या मल्लांना लखनौतील निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यास अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने परवानगी दिली होती. निवड चाचणी स्पर्धेत दीपक पुनियाने साहील जगलन आणि दीपक चहल यांच्यावर 4-0 अशा समान गुणफरकाने विजय मिळविला. तसेच त्याने 23 वर्षांखालील वयोगटातील आशियन चॅम्पियन व्हिकीलाही पराभूत केले.
57 किलो गटामध्ये अमन सेहरावतने राहुलचा अंतिम लढतीत 11-1 अशा गुणांनी पराभव केला. तर 65 किलो वजन गटात सुजित कालकलने विशाल कालिरमनाचा 2-0 असा पराभव करत भारतीय संघामध्ये स्थान मिळविले. मात्र 74 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीमध्ये यश तुषीरने अभिमन्यूचा पराभव केला. पणया वजन गटात सागर जगलन हा विजेता ठरला. त्याने जयदीपचा अंतिम लढतीत 8-6 असा पराभव केला. 86 किलो वजन गटात मुकुल दाहियाने अमिनचा 4-2 अशा गुणांनी पराभव करत विजेतेपद मिळविले. 125 किलो हेव्हीवेट गटामध्ये रजत राहुलने दिनेशचे आव्हान 10-6 असे संपुष्टात आणले.
रविवारी ग्रीको रोमन पद्धतीची निवड चाचणी संपुष्टात आली. त्यामध्ये 60 किलो गटात सुमितने अंतिम लढतीत चेतनचा 9-5 असा पराभव केला तर दीपकने 67 किलो वजन गटात निरजला 10-6 अशा गुणांनी हरवून विजेतेपद मिळविले. 77 किलो गटात अमनने विजयवर 6-5 अशा गुणांनी मात केली. 87 किलो गटातील लढतीत सुनीलने रोहीत बुराचा पराभव केला.
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे...
फ्रीस्टाईल-57 किलो गट-अमन सेहरावत, 65 किलो गट-सुजित कालकल, 74 किलो गट-सागर जगलन, 86 किलो गट-मुकुल दाहिया, 97 किलो गट-दीपक पुनिया, 125 किलो गट-रजत राहुल, ग्रीकोरोमन- 60 किलो गट-सुमित, 67 किलो गट-दीपक, 77 किलो गट-अमन, 87 किलो गट-सुनील, 97 किलो गट-नितेश, 130 किलो गट-दिपांशु.