भारतीय महिलांचा हाँगकाँगवर विजय
वृत्तसंस्था/ पुणे
येथील बालेवाडी टेनिस संकुलामध्ये सुरु असलेल्या बिली जिन किंग चषक आशिया ओसेनिया गट-1 महिलांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत यजमान भारतीय टेनिस संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना हाँगकाँगचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या स्पर्धेत भारताने पहिल्या लढतीत थायलंडवर मात केली होती.
भारत आणि हाँगकाँग यांच्यातील या लढतीमध्ये भारताच्या वैदेही चौधरीने हाँगकाँगच्या हो चिंग वु हिचा तब्बल दोन तासांच्या कालावधीत 7-6 (10-8), 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या श्रीवल्ली भामिदीपतीने हाँगकाँगच्या हाँग कोडे वाँगचा 7-6 (8-6), 2-6, 6-3 अशा 3 सेट्समधील लढतीत पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा सामना 2 तास 27 मिनिटे चालला होता. या सामन्यात श्रीवल्लीने 8 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. तिसऱ्या आणि शेवटच्या दुहेरी सामन्यात हाँगकाँगच्या युडीसी चाँग आणि हाँग कोडे वाँग या जोडीने भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांचा 7-6, 3-6, 11-13 अशा सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यातील पराभवामुळे भारतीय महिला टेनिस संघाला ही लढत एकतर्फी जिंकता आली नाही. आता या स्पर्धेत भारतीय महिला संघाची तिसरी लढत चीन तैपेई बरोबर होणार आहे. सदर स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ (साई) आणि महाराष्ट्र क्रीडा युवजन खात्यातर्फे आयोजित केली आहे.