भारतीय महिला टेनिस संघाचा सलग तिसरा विजय
वृत्तसंस्था/ पुणे
येथील म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात सुरु असलेल्या बिली जिन किंग चषक आशिया ओसेनिया गट-1 महिलांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत यजमान भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखत प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सलग 3 विजय नोंदविले आहेत.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने चीन तैपेईचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या कामगिरीमुळे भारताने स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत आणि चीन तैपेई यांच्यातील या लढतीत झालेल्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात वैदेही चौधरीने चीन तैपेईच्या लीनचा 6-2, 5-7, 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे भारताने चीन तैपेईवर 1-0 अशी आघाडी मिळविली. या स्पर्धेत वैदेहीचा दुसरा विजय आहे. हा सामना 2 तास चालला होता. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या श्रीवल्ली भामीदीपतीने चीन तैपेईच्या जोना गार्लंडचा 6-2, 7-6 (7-3) अशा सेट्समध्ये पराभव केल्याने भारताने चीन तैपेईवर 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली. हा दुसरा एकेरीचा सामना अडीच तास चालला होता. तिसऱ्या आणि शेवटच्या दुहेरीच्या सामन्यात चीन तैपेईच्या चो आणि वेयु या जोडीने भारताच्या अंकिता रैना आणि प्रार्थना ठोंबरे यांचे आव्हान 6-2, 4-6, 10-6 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. हा सामना दीड तास चालला होता. आता भारताचा या स्पर्धेतील शेवटचा सामना कोरिया प्रजासत्ताक बरोबर होणार आहे.