For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

06:19 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला संघाची विजयी सलामी
Advertisement

इंग्लंडचा 38 धावांनी पराभव, जेमिमा रॉड्रिग्स ‘सामनावीर’, भाटियाचे अर्धशतक, नंदिनी शर्माचे तीन बळी

Advertisement

वृत्तसंस्था, चेम्सफोर्ड

सामनावीर जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटीया यांची दमदार अर्धशतके तसेच नंदिनी शर्मा आणि क्रांती गौड यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडचा पहिल्या सामन्यात 38 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली.

Advertisement

12 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची उभय संघातील ही शेवटची सरावाची मालिका म्हणून ओळखली जाते. या पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकांत 7 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 150 धावांपर्यंत मजल मारली.

भारताच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार स्मृती मानधना बेलच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाली. त्यानंतर बेलने याच षटकातील शेवटच्या चेंडूवर भारताला आणखी एक धक्का देताना सलामीच्या शेफाली वर्माला दोन धावांवर बाद केले. या सामन्यात हरमनप्रित कौर खेळू न शकल्याने मानधनाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते.

यास्तिका भाटीया आणि जेमिमा रॉड्रिग्स या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 76 चेंडूत 126 धावांची शतकी भागिदारी केली. भाटीयाने 40 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 54 धावा झोडपल्या. चोरटी धाव घेण्याच्या नादात ती धावचीत झाली. चार्ली डीनने स्वत:च्याच गोलंदाजीवर रॉड्रिग्सला टिपले. तिने 40 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 69 धावा जमविल्या. भाटीयाने 31 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह तर रॉड्रिग्सने 31 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. रिचा घोष केवळ 4 धावांवर बाद झाली. भारती फुलमालीने 7 तर दीप्ती शर्माने 13 चेंडूत 4 चौकारांसह 22, अरुंधती रे•ाrने 9 तर क्रांती गौडने 1 धाव जमविली. भारताला 20 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांनी 19 वाईड चेंडू टाकले. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे लॉरेन बेलने 34 धावांत 3 तर वाँग, कोलमन आणि डीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 73 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर भारताची स्थिती 2 बाद 101 अशी होती.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये अॅमी जोन्सने एकाकी लढत देत 48 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावा जमविल्या. नाईटने 24 चेंडूत 2 चौकारांसह 21 तर सलामीच्या डंक्लेने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा केल्या. कर्णधार डीनने 1 चौकारासह नाबाद 11 तर इक्लेस्टोनने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. नाईट आणि जोन्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडला 20 षटकांत 8 बाद 150 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतातर्फे नंदिनी शर्माने 34 धावांत 3, तर क्रांती गौडने 24 धावांत 2 तसेच श्रीचरणी आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावामध्ये 1 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 43 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर इंग्लंडने 2 बाद 85 धावांपर्यंत मजल मारली होती. जोन्सने 32 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले.

संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 7 बाद 187 (जेमिमा रॉड्रिग्स 69, यास्तिका भाटीया 54, दीप्ती शर्मा 22, अवांतर 20, बेल 3-34, वाँग, कोलमन आणि डीन प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 20 षटकांत 8 बाद 150 (डंक्ले 16, नाईट 21, जोन्स 67, डीन 11, इक्लेस्टोन 13, अवांतर 3, नंदिनी शर्मा 3-34, क्रांती गौड 2-24, श्रीचरणी व दीप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.