भारतीय महिला संघाची विजयी सलामी
आशिया चषक स्पर्धा, थायलंडचा 94 धावांनी पराभव
वृत्तसंस्था, दुबई
2026 च्या आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सांघिक अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने विजयी सलामी देताना थायलंडचा 94 धावांनी पराभव केला. अर्धशतक झळकविणाऱ्या शेफाली वर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकांत 9 बाद 159 धावा जमवित थायलंडला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले. पण भारताच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर थायलंडचा डाव केवळ 16.1 षटकांत 65 धावांत आटोपला.
भारताच्या डावामध्ये सलामीची फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना तिसऱ्याच षटकांत एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाली. तिने शेफाली वर्मा समवेत सलामीच्या गड्यासाठी 18 चेंडूत 38 धावांची भर घातली. मानधना बाद झाल्यानंतर शेफाली वर्माला रावलने चांगली साथ दिली. या जोडीने 36 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली. रावलने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. कर्णधार कौर केवळ 5 धावांवर तंबूत परतली. फुलमालीने 2 चौकारांसह 13 तर क्रांती गौडने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 15 धावा जमविल्या. रिचा घोष, दिप्ती शर्मा, प्रेमा रावल, नंदिनी शर्मा हे फलंदाज लवकर बाद झाले. शेफाली वर्माने 36 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावा झळकविल्या. भारताच्या डावात 5 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 65 धावा जमविताना 1 गडी गमविला. 10 षटकाअखेर भारताने 2 बाद 101 धावा जमविल्या होत्या. शेवटच्या 10 षटकांमध्ये थायलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना केवळ 58 धावा करण्याची संधी दिली. थायलंडतर्फे लाओमीने 26 धावांत 3 तर सी. सुनिदाने 37 धावांत 2 तर फुथावाँग आणि चेनीदा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दिप्ती शर्माचा हा भारतातर्फे 150 वा टी-20 सामना असून या स्पर्धेत सर्वाधिक धावा जमविणारी ती तिसऱ्या क्रमांकाची भारतीय फलंदाज आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या स्पर्धेत आतापर्यंत 202 धावांसह पहिले स्थान तर स्मृती मानधनाने 171 धावांसह दुसरे स्थान मिळविले आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना थायलंडच्या डावात नेन्नापात के. हिने 48 चेंडूत 5 चौकारांसह 41 धावा जमविल्या. थायलंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. थायलंडच्या डावामध्ये 8 चौकार नोंदविले गेले. पहिल्या 6 षटकांत थायलंडने 39 धावा जमविताना 3 गडी गमविले. 10 षटकाअखेर थायलंडची स्थिती 6 बाद 44 अशी होती. भारतातर्फे नंदिनी शर्मा आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 तर श्रीचरणीने 10 धावांत 2, क्रांती गौडने 26 धावांत 1 गडी बाद केला. दिप्ती शर्माने या सामन्यात आपल्या फिरकीच्या जोरावर 7 चेंडूत एकही धाव न देताना थायलंडचे तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: भारत 20 षटकांत 9 बाद 159 (शेफाली वर्मा 64, प्रतिका रावल 22, स्मृती मानधना 19, भारती फुलमाली 13, क्रांती गौड नाबाद 15, अवांतर 23, सी. सुनिदा 2-31, एस. लाओमी 3-26), थायलंड 18.1 षटकांत सर्वबाद 65 (नेन्नापात के. 41, नंदिनी शर्मा 3-18, दिप्ती शर्मा 3-0, श्रीचरणी 2-10, क्रांती गौड 1-26).