For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

06:22 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय
Advertisement

सामनावीर दयालन हेमलता : 24 चेंडूत नाबाद 41

Advertisement

वृत्तसंस्था/ सिलेत (बांगलादेश)

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर असून उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा डकवर्थ लेवीस नियमाच्या आधारे 19 धावांनी पराभव केला. या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय असून त्यांनी बांगलादेशवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताच्या हेमलताला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. बांगलादेशचा डाव 20 षटकात 119 धावांत आटोपला. त्यानंतर भारताच्या डावामध्ये 5.2 षटकांचा खेळ झाला असताना पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे खेळ पंचांनी थांबविला. भारताने 5.2 षटकात 1 बाद 47 धावा जमविल्याने त्यांना डकवर्थ लेवीस नियमाच्या आधारे 19 धावांनी विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

बांगलादेशच्या डावामध्ये 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. मुर्शीदा खातूनने 49 चेंडूत 5 चौकारांसह 46, शोभना मोस्टेरीने 15 चेंडूत 4 चौकारांसह 19, दिलारा अख्तरने 6 चेंडूत 2 चौकारांसह 10, रितू मोनीने 18 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा केल्या. बांगलादेशच्या डावामध्ये इतर फलंदाजाना दुहेरी डावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे राधा यादवने 19 धावांत 3, श्रेयांका पाटीलने 24 धावात 2, दीप्ती शर्माने 14 धावात 2 आणि वस्त्रकरने 21 धावात 1 गडी बाद केला.

पावसाला प्रारंभ झाल्याने भारताच्या डावाला उशीरा सुरूवात झाली. त्यावेळी पंचांनी भारतीय संघाला विजयासाठी 5.2 षटकात 29 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. त्यानंतर भारताने 5.2 षटकात 1 बाद 47 धावा जमवित हा सामना 19 धावांनी जिंकला. शेफाली वर्माला आपले खाते उघडता आले नाही. स्मृती मानधना आणि हेमलता यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 46 धावांची भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मानधनाने 7 चेंडूत नाबाद 5 तर हेमलताने 24 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 41 धावा झोडपल्या. भारताच्या डावात 2 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मारूफा अख्तरने 11 धावात 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - बांगलादेश 20 षटकात सर्वबाद 119 (मुर्शीदा खातून 46, अख्तर 10, शोभना मोसेट्री 19, रितू मोनी 20, राधा यादव 3-19,श्रेयांका पाटील 2-24, दीप्ती शर्मा 2-14, वस्त्रकर 1-21), भारत 5.2 षटकात 1 बाद 47 (मानधना 5, शेफाली वर्मा 0, हेमलता नाबाद 41, अवांतर 1, मारूफा अख्तर 1-11).

Advertisement
Tags :

.