भारतीय महिला संघाचा दारुण पराभव
ऑस्ट्रेलियाचा 185 धावांनी दणदणीत विजय : सासमनावीर अॅलीसा हिली, बेथ मुनी यांची शतके
वृत्तसंस्था/ होबार्ट
कर्णधार अॅलिसी हिली आणि बेथ मुनी यांच्या दमदार शतकांच्या जोरावर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताचा 185 धावांनी दणदणीत पराभव केला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने तीनही सामने जिंकून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघाने 3 सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. पण त्यानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. आता या दौऱ्यात उभय संघात एकमेव कसोटी सामना खेळविला जाणार आहे.
या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 409 धावा झोडपल्या. त्यानंतर भारताचा डाव 45.1 षटकात 224 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार अॅलिसा हिलीने 98 चेंडूत 2 षटकार आणि 27 चौकारांसह 158 धावा फटकावल्या. बेथ मुनीने 84 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 106 धावा जमविल्या. लिचफील्डने 1 षटकारासह 14 धावा तर जॉर्जिया व्हॉलने 52 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 62 धावा केल्या. सदरलँडने 3 चौकारांसह 23 धावा तर निकोला कॅरेने 15 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 34 धावा जमविल्या. व्हॉल आणि हिली यांनी दुसऱ्या गड्यासाठी 104 धावांची भागिदारी केली. तर हिली आणि बेथ मुनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 145 धावांची भर घातली. हिलीने 79 चेंडूत 18 चौकारांसह तर मुनीने 82 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह शतके पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 6 षटकार आणि 51 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे स्नेह राणा आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 तर रेणुकासिंग ठाकुर, काश्वी गौतम व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदविता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. सलामीच्या स्मृती मानधनाला खातेही उघडता आले नाही. प्रतिका रावलने 6 चौकारांसह 27, रॉड्रीग्सने 9 चौकारांसह 42, कर्णधार हरमनप्रित कौरने 2 चौकारांसह 25, दीप्ती शर्माने 2 चौकारांसह 29, हरलीन देओलने 14, रिचा घोषने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 तर स्नेह राणाने 74 चेंडूत 6 चौकारांसह 44 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे अॅलाना किंग सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 33 धावांत 4 गडी बाद केले. तर वेअरहॅमने 3 धावांत 2 बळी मिळविले. निकोला कॅरे, सदरलँड आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. भारताच्या डावात 2 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 50 षटकात 7 बाद 409 (अॅलिसा हिली 158, बेथ मुनी नाबाद 106, व्हॉल 62, सदरलँड 23, कॅरे नाबाद 34, श्रीचरणी व स्नेह राणा प्रत्येकी 2 बळी, रेणुकासिंग ठाकुर, के. गौतम, दीप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी), भारत 45.1 षटकात सर्व बाद 224 (स्नेह राणा 44, रॉड्रीग्स 42, दीप्ती शर्मा 29, प्रतिका रावल 27, हरमनप्रित कौर 25, घोष 18, श्रीचरणी 11, अवांतर 14, अॅलाना किंग 4-33, वेअरहॅम 2-3, कॅरे, सदरलँड, गार्डनर प्रत्येकी 1 बळी).