भारतीय महिला संघ अर्जेन्टिनाकडून पराभूत
वृत्तसंस्था / रोझायिरो (अर्जेंटिना)
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचा चौरंगी स्पर्धेत यजमान अर्जेंटिनाविरुद्ध 2-4 असा पराभव झाला. कनिका सिवाचने (11 व 45 वे मिनिट) भारताकडून दोन गोल आणि स्पर्धेत तिचा प्रभावी फॉर्म कायम ठेवला. खेळ जलद गतीने सुरू झाला. पहिल्या क्वार्टरमध्येच चार गोल झाले. अर्जेटिनाने सोल गिनेट गुनाझने (5) गोल करुन सुरुवात केली. काही मिनिटांनंतर सोल ओल्लाला डे लाब्राने (7) ही आघाडी दुप्पट केली आणि यजमान संघाचे नियंत्रण मिळवले. 11 व्या मिनिटाला कनिकाने भारताचा एक गोल करीत यजमानांची आघाडी कमी केली. तथापि, अर्जेंटिनाने जलद प्रत्युत्तर दिले. 13 व्या मिनिटाला मिलाग्रोस डेल व्हेल अलास्ट्राने दोन गोलांची आघाडी आपल्या संघाला पुन्हा मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये शांततापूर्ण खेळानंतर अर्जेटिनाने 37 व्या मिनिटाला मॅक्सिसा डुपोर्टलने चौथा गोल केला. 45 व्या मिनिटाला कनिकाने आपला दुसरा गोल केला. ज्यामुळे भारताला आशा मिळाली. परंतु अर्जेटिनाने शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताला रोखण्यात यश मिळवले आणि सामना जिंकला.