भारतीय महिला संघाची घोषणा
हरमनप्रितचे पुनरागमन, संघात तीन नवे चेहरे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
श्रीलंकेत चालु महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या महिलांच्या वनडे तिरंगी मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार हरमनप्रित कौरचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसाठी के. गौतम, श्रीचरणी आणि सुची उपाध्याय या तीन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या वनडे मालिकेत द. आफ्रिका हा तिसरा संघ राहिल.
भारतीय क्रिकेट मंडळाच्या महिला निवड समितीने मंगळवारी येथे लंकेतील या तिरंगी वनडे मालिकेसाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. सदर स्पर्धा 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान खेळविली जाणार आहे. भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना यजमान लंकेबरोबर 27 एप्रिलला होईल. सदर स्पर्धेमध्ये दुहेरी राऊंड रॉबीन साखळी टप्प्यात प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर चार सामने खेळणार आहे. या टप्प्याअखेर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 11 मे रोजी खेळविला जाईल. या तिरंगी मालिकेतील सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर आयोजित केले आहेत.
2024 च्या डिसेंबरमध्ये भारतात झालेल्या विंडीज विरुद्धच्या मालिकेत कर्णधार हरमनप्रित कौर जखमी झाली होती. तत्पूर्वी गेल्या ऑक्टोबरमध्ये पाक विरुद्धच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात खेळताना 35 वर्षीय हरमनप्रित कौरच्या मानेचा स्नायु दुखावला होता. गेल्या जानेवारीमध्ये भारतात झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत हरमनप्रित कौरला विश्रांती देण्यात आली होती. महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे होते. लंकेत होणाऱ्या तिरंगी वनडे मालिकेसाठी स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या तिरंगी मालिकेसाठी काशवी गौतम, एन. श्रीचरणी आणि सुची उपाध्याय या तीन नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज रेणूकासिंग ठाकुर आणि तितास साधु यांना मात्र या तिरंगी मालिकेसाठी दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.
भारतीय महिला संघ: हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हर्लीन देवोल, जेमीमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तीका भाटीया, दिप्ती शर्मा, अमनज्योत कौर, के. गौतम, स्नेह राणा, अरुंधती रे•ाr, तेजल हसबनीस, श्रीचरणी, सुची उपाध्याय