भारतीय महिलांचा मालदिव्जवर दुसरा विजय
प्रेंडली सामन्यात 11-1 फरकाने धुव्वा, ल्हिंगदेइकिमचे पदार्पणातच 4 गोल
वृत्तसंस्था/ बेंगळूर
पदार्पणाच्या सामन्यात आघाडीवीर ल्हिंगदेइकिमने नोंदवलेल्या चार गोलांच्या बळावर भारतीय महिला संघाने येथे झालेल्या दुसऱ्या प्रेंडली सामन्यात मालदिव्जवर 11-1 अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळविला. याआधी पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी मालदिव्जचा 14-0 असा फडशा पाडला होता.
ल्हिंगदेइकिमने 12, 16, 56, 59 व्या मिनिटाला गोल नोंदवले. पदार्पण करणाऱ्या अन्य एक खेळाडू एन. सिबानी देवी 46 व्या मिनिटाला एक गोल केला. याशिवाय काजोल डिसोजा (15), पूजा (41), सिमरन गुरुंग (62 व 68), के. भूमिका देवी (71) यांनीही भारताचे गोल नोंदवले. मरियम फिराने मालदिव्जचा एकमेव गोल 27 व्या मिनिटाला नोंदवला. तसेच कर्णधार हव्वा हनीफाने 17 व्या मिनिटाला स्वयंगोल करून भारताच्या गोलसंख्येत भर घातली.
भारतीय संघाचे प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांनी या सामन्यात सहा बदल करणार असल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीच्या संघात ल्हिंगदेइकिम व सिबानी देवी या पदार्पणाची संधी मिळाली तर रिबन्सी जमू, थिंगबायजम संजीता देवी, जुही सिंग, मोनिषा सिंघा, भूमिका देवी, गुरुंग यांना नंतर पदार्पणाची संधी देण्यात आली.
भारताने पूर्वार्धातच 6-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण प्रारंभीच्या वेळेत भारतीय गोलरक्षक लिन्थोइनगम्बी देवीने अप्रतिम बचाव करून काही गोल थोपवले. पण संघाला लवकरच लय सापडल्यानंतर पहिल्या 17 मिनिटांतच भारताने 4 गोल नोंदवले. ल्हिंगोदेइकिमनेच भारताचे खाते उघडले. 15 व्या मिनिटाला तिनेच काजोलला गोल नोंदवण्यासाठी चेंडू पुरविला. ल्हिंगदेइकिमने नंतर वैयक्तिक दुसरा गोल सिबानीच्या मदतीने नोंदवला तर 17 व्या मिनिटाला मालदिव्जच्या हनीफाने स्वयंगोल करून भारताची आघाडी 4-0 अशी केली. 27 व्या मिनिटाला रिफाने भारतीय बचावफळीतील त्रुटीचा लाभ घेत मालदिव्जचा एकमेव गोल नोंदवला. त्यानंतर पूजाने 41 व पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट असताना सिबानीने भारताची आघाडी वाढविली. शेवटची 20 मिनिटे असताना मईशा अब्दुल हन्नाने पेनल्टी क्षेत्रात हेतुपूर्वक चेंडू हाताळल्यामुळे तिला बाहेर घालविण्यात आले, त्यामुळे मालदिव्जला 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले. 71 व्या मिनिटाला भूमिका देवीने पेनल्टीवर गोल नोंदवत 11-1 असा एकतर्फी विजय साकार केला.