भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय
इंग्लिश महिलांवर 24 धावांनी मात : मालिकेत 2-0 ने आघाडी : सामनावीर अमनजोत कौरची 63 धावांची खेळी
वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल (इंग्लंड)
हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारताला इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यातून नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीने कमबॅक केले आणि भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून दिला. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर 24 धावांनी मात केली आहे. भारताने इंग्लंडसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र इंग्लंडला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह भारतीय महिलांनी 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
प्रारंभी, इंग्लंडची कर्णधार नॅट ब्रंटने नाणेफेक जिंकत भारतीय महिलांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मानधना 13 धावांवर बाद झाली तर शेफाली वर्माला 3 धावा करता आल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही सपशेल निराशा केली. तिला केवळ 1 धाव करता आली. यावेळी जेमिमा रॉड्रिग्ज व अमनजोत कौरने संघाचा डाव सावरला. या जोडीने 93 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. जेमिमाने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 41 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 63 धावा फटकावल्या. अमनजोत कौरने अवघ्या 40 चेंडूत 9 चौकारासह नाबाद 63 धावांची खेळी साकारली. याशिवाय, रिचा घोषने 20 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने 20 षटकात 4 गडी गमावत 181 धावा केल्या.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश महिलांना 7 बाद 157 धावापर्यंत मजल मारता आली. सलामीची जोडी अपयशी ठरल्यानंतर कॅप्टन नेट सायव्हर ब्रँट हीलादेखील फार वेळ मैदानात थांबता आले नाही. नेट 13 रन्स करुन आऊट झाली. यानंतर टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन इंग्लंडच्या विजयाचा आशा कायम ठेवल्या. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. टॅमी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाली आणि सेट जोडी फुटली. टॅमीने इंग्लंडसाठी सर्वाधिक 54 रन्स केल्या. टॅमीने या खेळीत 1 षटकार आणि 8 चौकार लगावले. इतर खेळाडूंनीही निराशा केल्यामुळे इंग्लंडला 24 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाकडून श्री चरणीने 2 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा आणि अमनज्योत कौर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान उभय संघातील तिसरा आणि निर्णायक सामना हा शुक्रवारी 4 जुलैला होणार आहे. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकण्यासह मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी तिसर्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 20 षटकांत 4 बाद 181 (स्मृती मानधना 13, जेमिमा रॉड्रिग्ज 63, अमनजोत कौर नाबाद 63, रिचा घोष नाबाद 32, लॉरेन बेल 2 बळी)
इंग्लिश महिला संघ 20 षटकांत 4 बाद 157 (टॅमी ब्यूमोंट54, अॅमी जोन्स 32, सोफी नाबाद 35, श्रीचरणी 2 बळी, दीप्ती व अमनजोत प्रत्येकी 1 बळी).