बांगलादेशविरुद्ध भारतीय महिलांची मालिका लांबणीवर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशविरुद्ध पुढील महिन्यात मायभूमीत होणारी मर्यादित षटकांची मालिका बीसीसीआयने पुढे ढकलली आहे, याच कालावधीत विश्वविजेत्या संघासाठी वेगळी मालिका आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तितकेच टी-20 सामने हे आयसीसीच्या आगामी कार्यक्रमाचा भाग होते आणि कोलकाता आणि कटकमध्ये ते खेळले जाण्याची अपेक्षा होती. आम्ही डिसेंबरमध्ये पर्यायी मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न करू, त्यादृष्टीने अद्याप काम सुरू आहे. बांगलादेशविऊद्धच्या मालिकेबाबत आम्हाला त्यासाठी पुढे जाण्याची परवानगी मिळालेली नाही, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसी एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघासाठी बांगलादेशविरुद्धची मालिका ही पहिली मालिका राहणार होती. जरी ते स्पष्टपणे सांगण्यात आलेले नसले, तरी दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावपूर्ण राजनैतिक संबंधांमुळे ही मालिका बदलण्याचा प्रसंग आलेला असू शकतो. आम्हाला बीसीसीआयकडून मालिका रद्द करण्याबाबत पत्र मिळाले आहे आणि आता आम्ही नवीन तपशीलाची वाट पाहत आहोत, असे बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. महिला प्रीमियर लीगनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होईल.