चंदीगड, कर्नाटक, मिझोराम, हरियाणा विजयी
वृत्तसंस्था, रांची (झारखंड)
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या 16 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सहाव्या दिवशी झालेल्या विविध सामन्यांत चंदीगड, कर्नाटक, दादरा-नगर हावेरी, मिझोराम, ओडिशा आणि झारखंड यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविले.
ब विभागातील अ गटात खेळविण्यात आलेल्या सामन्यात दादरा-नगर हावेली संघाने तामिळनाडूचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल नगर हावेली संघातील अनुष्का गुप्ताने 41 व्या मिनिटाला नोंदविला. ब विभागातील अन्य एका सामन्यात चंदीगडने हिमाचलप्रदेशचे आव्हान 4-1 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले. या सामन्यात चंदीगडतर्फे अनुने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली तर चंदीगडच्या राणी राधाने एक गोल नोंदविला. हिमाचलप्रदेशतर्फे खुशविंदर गिलने 1 गोल केला.
ब विभागातील अन्य एका सामन्यात कर्नाटकाने गुजरातचा 6-1 अशा गोलफरकाने पराभव केला. कर्नाटकातर्फे केपी सिंचनाने 2 गोल तर तानिया, कुसुमांजली, प्रिती नीलार्दी आणि बसम्मा हुगन्नावर यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. गुजराततर्फे एकमेव गोला पार्वती बेन गमारने केला. अ विभागातील झालेल्या सामन्यात मिझोरामने छत्तीसगडवर 2-1 अशी मात केली. क गटातील एका सामन्यात हरियाणाने मणिपूरचा 4-2 असा फडशा पाडला. हरियाणातर्फे राधिका, दिया, विशाखा आणि अंतिका यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. अ विभागातील झालेल्या सामन्यात ओदीशाने आंध्रप्रदेशचे आव्हान 4-0 असे संपुष्टात आणले. ओदीशातर्फे स्विटी कुजूर, प्रिन्सेस एका, दिपीका बागे आणि अर्चना कुजूर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. दिवसातील शेवटच्या सामन्यात झारखंडने महाराष्ट्राचे आव्हान 6-0 असे संपुष्टात आणले. झारखंडतर्फे सुस्मिता गुरीया, संदीपा कुमारी, श्रुती कुमारी, पुष्पा मांझी, सानिया किर्ती, प्रिटी बिलुंग यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.