भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा सामना मलेशियाशी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सलग तिसऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय महिला हॉकी संघ 19 नोव्हेंबर रोजी भोपाळमध्ये सुरू होणाऱ्या सहा देशांच्या स्पर्धेत मलेशियाविऊद्ध आपल्या मोहिमेची सुऊवात करेल.
ही स्पर्धा भोपाळमधील नाथू बरखेडा येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील नवीन हॉकी स्टेडियमवर आयोजित केली जाईल, ज्यात भारत, जपान, चीन, मलेशिया, थायलंड आणि दक्षिण कोरिया हे संघ सहभागी होतील. गेल्या महिन्यात जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
यजमान संघाने 2016, 2023 आणि 2024 मध्ये विजेतेपद पटकावलेले असून तीन वेळचे विजेता म्हणून ते या स्पर्धेत प्रवेश करतील. ही स्पर्धा राऊंड-रॉबिन स्वरूपात होईल, ज्यात प्रत्येक संघ इतर पाच संघांशी एकदा सामना करेल. लीग टप्प्याच्या शेवटी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शुभारंभाच्या दिवशी आशियातील अव्वल क्रमांकाचा संघ चीन थायलंडविऊद्ध स्पर्धेचा सलामीचा सामना खेळेल.
त्याच दिवशी उद्घाटन सोहळ्यानंतर होणाऱ्या सामन्यात भारत मलेशियाविऊद्ध आपल्या मोहिमेला सुऊवात करेल. त्यानंतर यजमान संघ 21 नोव्हेंबरला दक्षिण कोरिया, 22 नोव्हेंबरला थायलंड, 24 नोव्हेंबरला चीन आणि 25 नोव्हेंबरला जपानचा सामना करेल. 20, 23 आणि 26 नोव्हेंबर हे विश्रांतीचे दिवस म्हणून निश्चित करण्यात आले आहेत, असे हॉकी इंडियाने म्हटले आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठीचा वर्गीकरण सामना, त्यानंतर दोन उपांत्य फेरीचे सामने 27 नोव्हेंबर रोजी होतील. कांस्यपदकाचा सामना आणि अंतिम सामन्याने 28 नोव्हेंबर रोजी स्पर्धेची सांगता होईल.
मध्यप्रदेश महिला आशियाई चॅम्पियन्स चषक भोपाळ 2026 ही आशियातील महिला हॉकीच्या वाढत्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्याची एक उत्तम संधी आहे, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले. भोपाळ यजमानपद भूषवणार असल्याचा मला आनंद आहे आणि आपला भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत नुकत्याच मिळवलेल्या यशाच्या जोरावर आपली कामगिरी उंचावेल आणि आपले विजेतेपद कायम राखेल, अशी मला आशा आहे, असेही त्यांनी सांगितले.
