भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
वृत्तसंस्था/ रांची
आगामी पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी येथे सुरू असलेल्या पात्र फेरीच्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय महिला हॉकी संघाने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताने येथे दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
जागतिक महिला हॉकी मानांकनात भारतीय संघाने सातवे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेतील ब गटातील सलामीच्या सामन्यात शनिवारी अमेरिकेने भारताचा 1-0 अशा गोल फरकाने पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय महिला हॉकी संघाचे मानांकनातील स्थान घसरले. तर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या सामन्यात इटलीचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
अमेरिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या चुकांमध्ये सुधारणा केल्या आणि त्यांनी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. भारतीय संघाच्या कामगिरीत निश्चितच सुधारणा होत असल्याचे जाणवले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताचे खाते संगीताने उघडले. सलिमा टेटेने दिलेल्या पासवर संगीताने न्यूझीलंडच्या बचावफळीला हुलकावणी देत हा अप्रतिम मैदानी गोल केला. यानंतर भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. या सामन्यात भारताला आठव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण दिपिकाचा पेनल्टी कॉर्नरवरील फटका न्यूझीलंडची गोलरक्षक ग्रेसने अचूकपणे थोपविला. न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हुलने अचूक गोल नोंदवून न्यूझीलंडला बरोबरी साधून दिली. 12 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि नेहाने भारताची आघाडी 2-1 अशी वाढविली. 40 व्या मिनिटाल न्यूझीलंडला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याना लाभ घेता आला नाही. भारताला शेवटच्या 10 मिनिटात किमान तीन संधी गोल करण्यासाठी उपलब्ध झाल्या होत्या. पण त्या वाया गेल्या. भारताचा सहावा पेनल्टी कॉर्नरही वाया गेला. भारताच्या आघाडी फळीने आपल्या आक्रमणावर तिसरा गोल करुन न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत आता ब गटात अमेरिका पहिल्या स्थानावर असून त्यांनी आपले दोन्ही सामने जिंकत पहिला स्थान मिळविले असून या गटात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारताने ब गटात दुसरे स्थान मिळविले. मंगळवारी भारत आणि इटली तसेच न्यूझीलंड आणि अमेरिका यांच्यात सामने होणार आहेत.