For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला हॉकी संघाचा तिसरा पराभव

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला हॉकी संघाचा तिसरा पराभव
Advertisement

वृत्तसंस्था / पर्थ

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघ यांच्यात पाच सामन्यांची ही हॉकी मालिका खेळविली जात आहे. दरम्यान पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला हॉकी संघाने भारताचा पराभव केला होता. गुरुवारी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ट महिला हॉकी संघाने भारताचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. गुरुवारच्या सामन्यात 9 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या खाते कोर्टनी स्कोरेलने उघडले. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी भारतावर मिळविली होती. खेळाच्या पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने आपले खाते उघडल्यानंतर त्यांना पुढील दोन सत्रांमध्ये आपली आघाडी वाढविता आली नाही.

दरम्यान चौथ्या आणि शेवटच्या पंधरा मिनिटांच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने दुसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल 52 व्या मिनिटाला ग्रेस स्टिव्हर्टने नोंदविला. गुरुवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत आक्रमक चढाया करत भारताच्या बचावफळीवर चांगलेच आणले आणि त्यांनी पहिला पेनल्टी कॉर्नरही मिळविला. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण भारतीय गोलरक्षकाने हे कॉर्नर्स थोपविल्याने त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय आघाडी फळीतील खेळाडूंनी चांगल्या चाली रचल्या आणि भारताला 2 पेनल्टी कॉर्नर्सही मिळाले. पण त्याचा लाभ भारताला उठविता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या आघाडी आणि बचावफळीमध्ये योग्य समन्वय असल्याने भारताला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आलेले नाही. या दौऱ्यातील भारतीय महिला हॉकी संघाचा चौथा सामना येथे शनिवारी खेळविला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.