भारतीय महिला हॉकी संघाला पाचवे स्थान
विश्वचषक महिला हॉकी स्पर्धा : भारताची जर्मनीवर 3-1 गोलफरकाने मात, नवनीतचे 2 गोल
वृत्तसंस्था, अॅमस्टेलव्हीन (नेदरलँड्स)
2026 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने तब्बल 52 वर्षांच्या इतिहासात ऐतिहासिक सर्वोत्तम कामगिरी करत पाचवे स्थान मिळविले. पाचव्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यामध्ये भारतातर्फे नवनीत कौरने 44 व्या आणि 47 व्या मिनिटाला असे 2 गोल करुन संघाच्या विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. तसेच इशिकाने 43 व्या मिनिटाला भारतातर्फे 1 गोल नोंदविला. जर्मनीतर्फे एकमेव गोल 59 व्या मिनिटाला लिन क्रिंग्जने केला. 1974 साली पहिल्यांदा महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा घेतली गेली होती आणि त्यामध्ये अजिंदर कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने चौथे स्थान पटकाविले होते. त्यानंतर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला आतापर्यंत दर्जेदार कामगिरी करता आली नव्हती. 2026 च्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या संघामध्ये भारतीय महिला हॉकी संघ अकरावा आहे. महिला हॉकी संघाच्या मानांकनात भारतीय संघ सध्या नवव्या स्थानावर आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने केवळ एकमेव सामना ऑलिम्पिक चॅम्पियन्स आणि यजमान नेदरलँड्सकडून गमविला आहे. नेदरलँड्सने भारताचा 2-0 असा पराभव केला होता.
विश्वचषक हॉकी स्पर्धेतील या कामगिरीमुळे आता पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निश्चितच भारतीय महिला हॉकी संघाचा आत्मविश्वास नक्कीच अधिक राहिल. नेदरलँड्समध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनला 2-2 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर पुढील सामन्यात त्यांनी दक्षिन आफ्रिकेचा 6-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. तसेच भारतीय महिला हॉकी संघाने इंग्लंड बरोबरचा सामना बरोबरीत सोडविला. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला गोलशून्य बरोबरीत रोखल्याने भारताचे उपांत्य फेरीत पोहचण्याचे स्वप्न अधुरे राहिले. यानंतर खालच्या स्थानासाठी भारतीय संघाला लढत द्यावी लागली.
भारत आणि जर्मनी यांच्यातील झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकीपटुंनी शेवटच्या 15 मिनिटात आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत 3 गोल नोंदविले. तर जर्मनीला सामना संपण्यास केवळ 1 मिनिट बाकी असताना एकमेव गोल नोंदविता आला. भारतीय महिला हॉकी संघाला मारीजेनी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मारीजेनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक चौथे स्थान पटकाविले होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेतील या सामन्यापूर्वी खेळविण्यात आलेल्या सरावाच्या दोन सामन्यात जर्मनीने भारताचा पराभव केला होता. पाचव्या स्थानासाठीच्या झालेल्या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर अधिक भर दिल्याने गोलफलक कोराच राहिला होता. मात्र शेवटच्या 17 मिनिटांमध्ये भारतीय संघाने आपल्या डावपेचात बदल करत तसेच जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणताना उत्कृष्ट पासेस देत 3 गोल केले. या सामन्यात जर्मनीला 6 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण भारतीय संघाच्या भक्कम गोलरक्षणामुळे त्यांना गोल करता आले नाहीत. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर 5 व्या मिनिटाला नवनीत कौरने चेंडूवर ताबा मिळवित सलिमाकडे पास दिला. पण जर्मनीच्या गोलरक्षकाने सलिमाचा पेनल्टी कॉर्नरवरील फटका थोपविला. 9 व्या मिनिटाला जर्मनीने गोल करण्याची संधी गमाविली. 14 व्या मिनिटाला शिल्पी दबासने दिलेल्या पासवर नेहाला गोल करता आला नाही. 15 व्या मिनिटाला जर्मनीला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण तो वाया गेला. भारतीय संघाची गोलरक्षक बिचूदेवी हिची कामगिरी या सामन्यात दर्जेदार झाली. तिने जर्मनीचे पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर थोपविले. 22 व्या मिनिटाला भारताने खाते उघडण्याची सुवर्णसंधी गमविली. नवनीतला या संधीचा फायदा घेता आला नाही. 35 व्या मिनिटाला इशिकाने जर्मनीच्या गोलपोस्टपर्यंत मजल मारली. पण तिला शेवटच्या काही सेकंदात चेंडूवर ताबा राखता आला नाही.
43 व्या मिनिटाला इशिकाने जर्मनीच्या बचावफळीतील खेळाडुंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. 44 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण नवनीतचा फटका जर्मनीच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत अचूकपणे गोलपोस्टमध्ये विसावला. त्यामुळे भारताने जर्मनीवर 2-0 अशी आघाडी मिळविली. 47 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल आणि वैयक्तिक दुसरा गोल नवनीत कौरने केला. 48 व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. 56 व्या मिनिटाला जर्मनीने आणखी एक पेनल्टी कॉर्नर वाया घालविला. 59 व्या मिनिटाला क्रिंग्जने जर्मनीचा या सामन्यातील एकमेव गोल केला.