भारतीय महिला हॉकी संघाची आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध कठीण परीक्षा
वृत्तसंस्था, अॅमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघ आज ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या फेरीतील सामन्याकडे अघोषित उपांत्यपूर्व फेरी म्हणून पाहत आहे. कारण आतापर्यंतच्या आशादायक कामगिरीनंतर या सामन्यातील विजयामुळे संघाला एफआयएच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात भारताला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि गतविजेत्या नेदरलँड्सकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला, तरीही संघ अजूनही अंतिम चारमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत कायम आहे.
स्पर्धेच्या नवीन स्वरूपानुसार, भारताचा सामना पुन्हा चीनशी होणार नाही आणि पहिल्या फेरीतील गुण पुढे ग्राह्य धरले जातील. चीनविऊद्धच्या पहिल्या सामन्यातील बरोबरीमुळे भारताच्या खात्यात एक गुण आहे, तर नेदरलँड्सने ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांचाही पराभव केल्यामुळे सहा गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवल्यामुळे चीनचे दोन गुण झाले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचाही एक गुण आहे.
उपांत्य फेरीत जाण्याचा भारताचा मार्ग स्पष्ट आहे. जर नेदरलँड्सने चीनविऊद्धचा सामना गमावला नाही, तर ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या विजयामुळे जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेला भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र जर चीनने नेदरलँड्सचा अनपेक्षित पराभव केला, तर भारत विऊद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल निरर्थक ठरेल. अशा परिस्थितीत चीनचे पाच गुण होतील, तर भारताने दिवसातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तरीही त्यांचे जास्तीत जास्त चारच गुण होऊ शकतील. जर चीनचा पराभव झाला आणि भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तर तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण होतील आणि अशा वेळी गोलफरकाचा विचार केला जाऊ शकतो.
भारताच्या या मोहिमेतील सर्वांत जमेची बाजू म्हणजे त्यांची भक्कम बचावफळी. इंग्लंडविऊद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला, कारण गोलरक्षक सविता आणि बिच्छू देवी यांनी अनेक महत्त्वपूर्ण बचाव केले तसेच भारताने सर्व 12 पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीपणे रोखले. त्यांनी नेदरलँड्सलाही पेनल्टी कॉर्नरद्वारे केवळ एकच गोल करू दिला आणि सतत दबाव असूनही डच संघाला गोल करता आला नाही. सलिमा टेटे हिने बचावामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जागतिक हॉकीमधील सर्वांत आक्रमक संघांपैकी एका संघाविऊद्ध भारताची बचावफळी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आता बचावातील या भक्कमपणाला आक्रमणातील अधिक प्रभावी कामगिरीची जोड देणे गरजेचे आहे.