भारतीय महिला हॉकी संघ पराभूत
वृत्तसंस्था / पर्थ
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच मित्रत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ ने भारताचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे नेसा फ्लिनने तिसऱ्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. ऑलिव्हीया डाऊनेसने नवव्या मिनिटाला ऑस्ट्रेलिया अ संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली. रुबी हॅरिसने 11 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलिया अ संघाचा तिसरा गोल केला. टेटुम स्टिवर्टने 21 व्या मिनिटाला गोल नोंदवून ऑस्ट्रेलिया अ संघाची आघाडी 4-0 अशी भक्कम केली. के. फिजपॅट्रीकने 44 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलिया अ संघाचा 5 वा आणि शेवटचा गोल केला. भारतातर्फे महिमा टेटेने 27 मिनिटाला पहिला गोल नोंदविला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलिया अ संघाने भारतावर 4-1 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यातील 45 व्या मिनिटाला नवनीत कौरने भारताचा दुसरा तर 50 व्या मिनिटाला लालरेमसीयामीने भारताचा तिसरा गोल केला. या लढतीमध्ये भारतीय संघाने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. तर पेनल्टी स्ट्रोकचा अचूक फायदा भारतीय महिला संघाला उठविता आला नाही. या सामन्यावेळी भारतीय महिला हॉकी संघाने दंडावर काळ्याफिती बांधून पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. या दौऱ्यातील भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर येथे रविवारी खेळविला जात आहे.