भारतीय महिलांची ‘सुवर्ण’ कामगिरी
44 वर्षानंतर एशियन गेम्समध्ये सुवर्ण : ऑलिम्पिकसाठीही पात्र : फायनलमध्ये चीनवर 1-0 ने मात
वृत्तसंस्था/ नागोया
भारतीय महिला हॉकी संघाने चीनला 1-0 ने पराभूत करत तब्बल 44 वर्षानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यासह, भारतीय महिला हॉकी संघाने 2028 च्या ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे. 1982 नंतर प्रथमच भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली आहे. दरम्यान, भारतीय पुरुष संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना आज मलेशियाविरुद्ध होणार आहे. यामुळे भारतीय हॉकीकडून आणखी एका सुवर्णपदकाची अपेक्षा असणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय महिलांनी संपूर्ण सामन्यावर वर्चस्व ठेवले. सामन्यातील पहिल्या सत्रापासूनच भारताने चीनवर हल्ला चढवला. सहाव्या मिनिटाला बलजीत कौरला ग्रीन कार्ड मिळाले. पण तरीदेखील भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरूच ठेवला. दरम्यान भारतासाठी 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या लालरेमसियामीने 10 व्या मिनिटाला पहिला गोल केला. हा या संपूर्ण सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल ठरला. त्यानंतर चीनच्या खेळाडूंनी एकापाठोपाठ एक हल्ले केले. पण भारताच्या गोलकिपरने एकही गोल होऊ दिला नाही.
दुसऱ्या सत्रात चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, यावेळी चायनाला बरोबरी साधण्याची संधी होती. पण, सविता पुनियाने गोल अडवला. यानंतर चीनने शेवटपर्यंत गोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेरीस भारतीय संघाने हा सामना 1-0 असा जिंकत ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. या अंतिम विजयामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेलाही मोठे बळ मिळाले आहे. या दणकेबाज यशानंतर भारतीय महिला संघाने मैदानावर एकच जल्लोष केला.
ऑलिम्पिकचा मार्ग झाला मोकळा
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकमेव गोल्ड मेडल 1982 मध्ये पटकावले होतं. त्यानंतर 1998 मध्ये भारतीय महिला संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण कोरियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2018 मध्ये भारतीय संघाला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले होते पण आता 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाने चीनवर दमदार विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीटही पक्के केले.