भारतीय महिला फुटबॉल संघ विजयी
भारत व स्पेन संघातील खेळाडू
वृत्तसंस्था / पर्थ
सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने येथे आयोजित केलेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात ऑस्ट्रेलियातील पर्थ अझुरी क्लबचा 7-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या सामन्यात सुरूवातीला पेनल्टीवर पर्थ अझुरीने भारतीय संघावर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर डेंगमेई ग्रेसने भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. खेळाच्या उत्तरार्धाताला प्रारंभ झाल्यानंतर ग्रेसने पहिल्या दोन मिनिटातच भारताला आघाडीवर नेले. ग्रेसचा या सामन्यातील हा दुसरा गोल ठरला. रिम्पा हलदार आणि बबीना देवी लिशाम यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवित भारताला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पर्थ अझुरीतर्फे दुसरा गोल नोंदविला गेला. सामन्याच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काव्या पी.ने 1 गोल तर संगीता बेसफोरने 2 गोल नोंदवून पर्थ अझुरीचे आव्हान 7-2 असे संपुष्टात आणले.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनने 26 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील विजेते संघ 2027 मध्ये ब्राझील येथे होणाऱ्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरतील. तर उपांत्यपूर्व फेरीत पराभव झालेल्या संघांना प्लेऑफ गटात सामने खेळावे लागतील.
भारतीय महिला फुटबॉल संघ: गोलरक्षक - पी. चानु, इंग्लेबाम, श्रेया हुडा, सौम्या नारायणसॅमी, बचावफळी -अॅस्टोन ओरॉन, ज्युली किशन, मार्टिना थोकचोम, पी. निर्मला देवी, संजू, सरिता युमनाम, शिल्की देवी हेमाम, सुस्मिता लिपेचा, स्विटीदेवी नेंगबाम, मध्यफळी- अंजू तेमांग, अवेका सिंग, बबीनादेवी लिशाम, जेसोदा मुंडा, एम. सेनफिडा, संगीता बेसफोर, आघाडी फळी - ग्रेस डेंगमी, पी. काव्या, लिंडा कॉम सेर्टो, पी. माल्विका, मनीषा कल्याण, प्यारी झेका, रिम्पा हलदर आणि सौम्या गुगलोथ.