भारतीय महिला फुटबॉल संघ विजयी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या भारताचा 20 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल संघ स्वीडनच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील लिडींगो येथे आयोजित केलेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात भारतीय महिला संघाने टॅबी एफके स्विडीश क्लबचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या दौऱ्यातील चार दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात हॅमरबाय आयएफ संघाकडून भारतीय महिला फुटबॉल संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाची कामगिरी चांगलीच सुधारीत झाल्याचे जाणवले. या सामन्यात भारतातर्फे बबीता कुमारीने 10 व्या मिनिटाला, लेहिंगडिकीमने 20 व्या मिनिटाला, बबीता कुमारीने 63 व्या मिनिटाला आणि नेहाने 80 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात भारतातर्फे बबीता कुमारीने दोन गोल नोंदविले. स्वीडनच्या टॅबी एफके संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. आता भारतीय फुटबॉल संघाचे या दौऱ्यातील आणखी दोन सामने होणार आहेत. 25 फेब्रुवारीला तिसरा तर 28 फेब्रुवारीला चौथा सामना खेळविला जाईल. थायलंडमध्ये एप्रिल महिन्यात होणाऱ्या महिलांच्या एएफसी आशिया चषक 20 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून भारतीय महिला फुटबॉल संघासाठी स्वीडनचा दौरा आयोजित केला आहे.