For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत

06:12 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत
Advertisement

जपानची स्पर्धेत विजयी सलामी : ऑस्ट्रेलियाही विजयी

Advertisement

वृत्तसंस्था,/ पथुम, थानी

2026 च्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटातील महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या सामन्यात जपानने भारताचा 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात मध्यंतरापर्यंत जपानने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती.

Advertisement

आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात सहा वेळेला विजेतेपद मिळविणाऱ्या जपानच्या महिला फुटबॉल संघाने यावेळी सलामीच्या सामन्यातच भारतीय महिला संघाचा एकतर्फी पराभव करत आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर 12 व्या मिनिटाला भारताच्या टी. चानू तोजमने आपल्या संघाच्या गोलपोस्टमध्ये चुकीने फटका मारुन जपानला बोनस गोल बहाल केला. या गोलानेच जपानच्या मोहिमेला प्रारंभ झाला. यानंतर मध्यंतरापर्यंत भारताच्या बचावफळीतील खेळाडुंनी भक्कम खेळ करत जपानला आपली आघाडी वाढवून दिली नाही. पण सामन्याच्या उत्तरार्धात हे चित्र पूर्णपणे पालटले.

सामन्यातील 54 व्या मिनिटाला मिकी किमुराने जपानचा दुसरा गोल नोंदविला. 57 व्या मिनिटाला फुकुशिमाने जपानचा तिसरा गोल केला. 75 व्या मिनिटाला नासूमी टॅगोने जपानचा चौथा गोल नोंदविला. मियू मॅटसुनेगाने 81 व्या मिनिटाला जपानचा पाचवा तर सामना संपण्यास केवळ 3 मिनिटे बाकी असताना युरा होंडाने जपानचा सहावा आणि शेवटचा गोल करुन भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. तब्बल 20 वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघ यावेळी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. आता या सामन्यानंतर क गटात जपानने आघाडीचे स्थान मिळविले असून या गटात भारत शेवटच्या स्थानावर आहे.

या स्पर्धेतील पहिल्या दिवशी झालेल्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने चीन तैपेईचा 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेत सहभागी झालेले संघ तीन गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ तसेच तीन गटातील तिसऱ्या स्थानावरील संघामधील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. आता भारतीय महिला फुटबॉल संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना 5 एप्रिल रोजी होणार आहे. तर भारताचा या स्पर्धेतील क गटातील पुढील सामना चीन तैपेई बरोबर 8 एप्रिल रोजी खेळविला जाईल.

Advertisement
Tags :

.