भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्ण
भारतीय महिलांनी विक्रमी धावसंख्येसह जेतेपद राखले, मानधनाचे अर्धशतक, शेफाली, रिचाची चमक, दीप्तीचे 3 बळी
वृत्तसंस्था, निशिन (जपान)
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताने पदक तक्त्यात सुवर्णपदकाचे खाते उघडले. महिलांच्या टी-20 क्रिकेट प्रकारात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 147 धावांनी दणदणीत पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील भारताचे हे सलग दुसरे सुवर्णपदक असून भारतीय महिला संघाने आपली मक्तेदारी कायम राखली आहे. लंकेला रौप्यपदक तर पाकने बांगलादेशला पराभूत करुन कांस्यपदक पटकाविले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला नाही. शेफाली वर्मा, स्मृती मानधना, रिचा घोष यांची दमदार फलंदाजी तसेच दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, श्रीचरणी व शेफाली वर्मा यांची भेदक गोलंदाजी ही वैशिष्ट्यो ठरली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 3 बाद 216 अशी स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या रचली. त्यानंतर लंकेचा डाव 15.4 षटकात केवळ 69 धावांत आटोपला.
भारताच्या डावामध्ये शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने 60 चेंडूत 99 धावांची भागिदारी केली. या जोडीने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 67 धावा झोडपल्या. या जोडीने संघाचे अर्धशतक केवळ 27 चेंडूत फलकावर लावले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय महिला संघाने नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. शेफाली आणि मानधना यांनी लंकेची फिरकी गोलंदाज सुगंधीका कुमारी हिच्या गोलंदाजीवर तिसऱ्या षटकात पाठोपाठ षटकार खेचले. त्यानंतर मिथाली अयोध्याच्या षटकामध्ये मानधनाने आपल्या खेळीतील तिसरा षटकार मारला. कर्णधार चमारी अट्टापट्टूच्या एका षटकात भारताच्या या सलामीच्या जोडीने 19 धावा झोडपताना 3 षटकार मारले. त्यापैकी शेफालीने 2 तर मानधनाने 1 षटकार खेचला. 10 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सुगंधीका कुमारीने शेफाली वर्माला झेलबाद केले. तिने 29 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 48 धावा जमविल्या. मानधनाने 30 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. भारताने 10 षटकात 1 बाद 99 धावांपर्यंत मजल मारली होती.
नंतर मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर, रिचा घोष यांनी धावांची गती अधिकच वाढवली. मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 28 चेंडूत 42 धावांची भर घातली. दिलहारीने हरमनप्रीत कौरला झेलबाद केले. तिने 17 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. सुंगधीका कुमारीने मानधनाला दिलहारीकरवी झेलबाद केले. मानधनाने 45 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकारांसह 79 धावा झळकाविल्या. भारताची स्थिती यावेळी 16.5 षटकात 3 बाद 163 अशी होती.
रिचा घोष आणि फूलमाली या जोडीने 19 चेंडूत अभेद्य 53 धावांची चौथ्या गड्यासाठी भागिदारी केल्याने भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. रिचा घोषने शेवटच्या 3 षटकात तुफान फटकेबाजी करताना केवळ 22 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 49 धावा तर फूलमालीने 1 चौकारासह नाबाद 7 धावा केल्या. लंकेतर्फे सुगंधीका कुमारी, कवीशा दिलहारी आणि प्रभोदा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या अचूक फिरकीसमोर लंकेच्या फलंदाजांनी तंबूत परतण्यासाठी घाई केली. लंकेच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार अट्टापट्टूवर होती. अट्टापट्टूने 21 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा जमविल्या. ती तिसऱ्या गड्याच्या रुपात बाद झाली. दीप्ती शर्माने तिला झेलबाद केले. तत्पूर्वी शेफाली वर्माने सलामीच्या दुलानीला व हसीनी परेराला बाद केले. कवीशा दिलहारीने 13 चेंडूत 1 चौकारासह 11 तर कौशिनीने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. लंकेच्या 3 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. 15.4 षटकात लंकेचा डाव 69 धावांत आटोपला. भारतातर्फे दीप्ती शर्माने 6 धावांत 3 तसेच शेफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 3 बाद 216 (शेफाली वर्मा 48, स्मृती मानधना 79, हरमनप्रीत कौर 19, रिचा घोष नाबाद 49, फुलमाली नाबाद 7, अवांतर 14, सुगंधीका कुमारी, कवीशा दिलहारी आणि प्रभोदा प्रत्येकी 1 बळी), लंका 15.4 षटकात सर्वबाद 69 (अट्टापट्टू 29, दिलहारी 11, कौशिनी 14, अवांतर 6, दीप्ती शर्मा 3-6, शेफाली वर्मा, श्रेयांका पाटील व श्रीचरणी प्रत्येकी 2 बळी).