For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिएतनामविरुद्ध लढतीने आज भारतीय महिलांचा आशियाई चषक प्रवास सुरू

01:59 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हिएतनामविरुद्ध लढतीने आज भारतीय महिलांचा आशियाई चषक प्रवास सुरू
Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

Advertisement

प्रतीक्षा संपली असून चार वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघ आज बुधवारी पर्थ येथील स्टेडियमवर होणार असलेल्या व्हिएतनामविऊद्धच्या सामन्याने एएफसी महिला आशियाई चषक ऑस्ट्रेलिया 2026 मधील प्रवासाला सुऊवात करण्यास सज्ज झाला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानुसार (एआयएफएफ) हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4.30 वा. सुरू होईल.

भारतीय महिलांचे विश्वचषकाचे स्वप्न त्यांच्याच भूमीत खंडित झाले होते. त्यावेळी संघाने एएफसी महिला आशियाई चषक भारत 2022 मधून माघार घेतला होती. तथापि, गेल्या वर्षी पात्रता फेरीत केलेल्या शानदार कामगिरीमुळे आता त्यांना दुसरी संधी मिळाली आहे. गुणवत्तेच्या आधारे भारताने आशियाई चषकासाठी पात्रता मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षाच्या सुऊवातीला भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या अमेलिया व्हॅल्व्हर्डे यांनी मागील दु:खांना दूर केले आहे.

Advertisement

‘ती घडामोड चार वर्षांपूर्वीची होती. आयुष्यात कोणताही योगायोग नसतो आणि आम्ही पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी घेऊन येथे परतलो आहोत. संघाचे सर्वोत्तम पद्धतीने प्रतिनिधीत्व करण्याची ही आमच्यासाठी एक नवीन संधी आहे’, असे कोस्टा रिकाच्या अमेलिया यांनी सांगितले. एएफसी महिला आशियाई चषक 12 सहभागी देशांना एक मोठी संधी उपलब्ध करतो. कारण उपांत्य फेरीतील चार संघांना ब्राझीलमध्ये होणाऱ्या 2027 च्या फिफा महिला विश्वचषकामध्ये थेट प्रवेश मिळेल. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत चारपैकी दोन संघ आशियातून थेट पात्र ठरणारे उर्वरित दोन संघ निश्चित करण्यासाठी स्पर्धा करतील. उर्वरित दोन संघ प्ले-ऑफ स्पर्धेत जातील, तेथूनही त्यांना जगातील सर्वांत मोठ्या स्पर्धेत प्रवेश मिळू शकेल.

फिफा क्रमवारीत 67 व्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने आशियाई चषकाच्या तयारीसाठी तीन खंडांमध्ये आयोजित 52 दिवसांच्या शिबिरात भाग घेतला. आधी गुऊग्राममध्ये त्यांचे शिबिर सुरू झाले आणि नंतर तुर्कीये येथे त्यांनी मोर्चा वळविला. भारतीय संघ आशियाई चषकाच्या तीन आठवडे आधी हवामानाशी जुळवून घेण्यासाठी पर्थमध्ये पोहोचला. भारताची कर्णधार स्वीटी देवी नगांगबम ही 2022 मध्ये ह्रदयभंग करणारा अनुभव घेणाऱ्यांपैकी एक होती. तथापि, तिने आशियाई चषकाबद्दल तिच्या प्रशिक्षकांच्या भावनांची री ओढली. ‘आम्ही खूप चांगली तयारी केली आहे. संघ तयार आहे आणि आम्ही एएफसी महिला आशियाई चषकात आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे, असे ती म्हणाली.

Advertisement
Tags :

.