भारतीय महिला आशियाई चॅम्पियन पाचव्यांदा पटकावले जेतेपद
फायनलमध्ये इराणवर मात
वृत्तसंस्था/ लाहोर
महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणला 32-25 असा पराभव करत पाचव्यांदा या चषकावर मोहोर उमटवली आहे. या विजयात कर्णधार सोनाली शिंगटे, पूजा यांच्यासह साक्षी शर्मा, ज्योती यांची कामगिरी महत्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, आशियाई कबड्डी स्पर्धेत तब्बल पाचवेळा भारताने जेतेपद पटकावले असून केवळ एकदा दक्षिण कोरियाने जेतेपदाला गवसणी घातली आहे.
सहाव्या महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत एकूण सात देशाचे संघ सहभागी झाले होते. अ गटात भारताचा समावेश होता, तसेच या गटामध्ये बांगलादेश, थायलंड व मलेशिया हे संघ होते. साखळी सामन्यात भारताने प्रत्येक सामन्यात आपला दबदबा राखत सर्व सामने जिंकले आणि सर्वोच्च स्थान मिळविले होते. उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 56-18 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात तगड्या इराण संघाचे भारतीय संघासमोर आव्हान होते. पण, भारतीय महिलांनी हे आव्हान यशस्वीरित्या पार पाडत जेतेपदाला गवसणी घातली. सुरुवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळ करताना इराणला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. विशेष म्हणजे, भारताच्या महिला संघाकडून जोरदार आक्रमणही करण्यात आल्याचे दिसले. पण, ते करत असताना त्यांनी चपळता दाखवत चांगला बचावही केला असल्याचे दिसून आले. या दमदार खेळाच्या भरवशावर भारतीय महिलांनी पाचव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.