For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांची कोरियाला नमवून अंतिम फेरीत धडक

06:55 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांची कोरियाला नमवून अंतिम फेरीत धडक
Advertisement

44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकावर नजर

Advertisement

वृत्तसंस्था, नागोया

उत्कृष्ट लयीत असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारताचे 44 वर्षांपासूनचे सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. भारतासाठी इशिका चौधरी (44 व्या मिनिटाला) आणि कर्णधार सलिमा टेटे (48 व्या मिनिटाला) यांनी गोल केले. आता भारत आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीचे दुसरे सुवर्णपदक जिंकण्यापासून केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे. यापूर्वी भारताने 1982 च्या नवी दिल्ली येथील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

Advertisement

अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या चीनशी होणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात 60 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करता न आल्याने सामना शूटआऊटमध्ये गेला. जिथे चीनने जपानचा 4-2 असा पराभव केला. कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाचा सामना जपानशी होईल. सामन्याच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखले आणि तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर्स मिळवले. मात्र कोरियन खेळाडूंनी भक्कम बचाव करत भारताचे प्रयत्न हाणून पाडले. सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक पवित्रा घेतल्याने खेळाचा बराचसा भाग कोरियन संघाच्या क्षेत्रात खेळला गेला. दुसऱ्याच मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु दीपिकाचा फ्लिक कोरियन गोलरक्षक सियोयन ली हिने उत्कृष्टरिय्ता अडवला.

दोन मिनिटांनंतर भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावेळी नवनीत कौरला संधी साधता आली नाही. 13 व्या मिनिटाला लांबून आलेल्या  चेंडूवर ऋतुजा पिसाळने केलेल्या डिफ्लेक्शनला कोरियन गोलरक्षकाने पुन्हा एकदा उत्कृष्टरित्या रोखले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताला आणखी तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण कोरियन बचाव फळी भेदण्यात त्यांना अपयश आले. 21 व्या मिनिटाला भारताला सहावा पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु चेंडू इंजेक्ट करण्यात चूक झाल्याने त्यांना संधी गमवावी लागली. पहिल्या सत्राच्या अखेरच्या दोन मिनिटांत भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. तरीही कोरियन बचाव फळी अभेद्य राहिली आणि पहिल्या दोन सत्रांनंतरही सामन्यात गोलशून्य बरोबरी कायम राहिली.

मैदानाची बाजू बदलल्यानंतरही भारताचे वर्चस्व कायम राहिले. परंतु कोरियन खेळाडूंनी आपल्या बचावफळीची रचना कायम राखत प्रतिस्पर्धंच्या आक्रमकतेला रोखून धरले. 44 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर एका सुरेख व्हेरिएशनचा वापर करून भारताने हा कोंडीचा अडथळा दूर केला. सेटपीस दरम्यान दीपिकाने घेतलेल्या अप्रत्यक्ष फटक्यावर इशिकाने चेंडूला दिशा बदलून गोल केला आणि कोरियन बचावफळीला चकित केले. त्यानंतर चार मिनिटांनी उजव्या बाजूने शानदार सोलो रन करत सलिमा हिने सुरेख फील्ड गोल नोंदवला आणि भारताची आघाडी दुप्पट केली. मात्र पेनल्टी कॉर्नरच्या बाबतीत भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. 57 व्या मिनिटाला भारताने सलग दोन सेटपीस वाया घालवले. कारण कोरियन गोलकीपरने पुन्हा एकदा दीपिकाचा प्रयत्न हाणून पाडला. सामन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियाला सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु भारतीय खेळाडूनी भक्कम बचाव करत प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्यापासून रोखले आणि चीनविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपली बचावफळी अभेद्य असल्याचे सिद्ध केले.

Advertisement
Tags :

.