एसटी हॉकी : भारतीय महिला आज थायलंडला नमविण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)
दोन सामन्यांमध्ये लागोपाठ विजयाने उत्साहित झालेल्या यजमान भारत महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (एसीटी) आज गुरुवारी थायलंडला नमविण्याच्या उद्देशाने आपल्या खेळाच्या लहानसहान बाबींवर काम करून कच्चे दुवे दूर करण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि विद्यमान ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीन हे दोघेही आतापर्यंत दोन सामन्यांत अपराजित राहिले आहेत. पण यजमानांचा गोल फरक कमी आहे.
चीन 20 च्या गोल फरकासह गुणतालिकेत अव्वल आहे, तर भारताचा गोल फरक 5 आहे आणि गुऊवारी मोठा विजय मिळविल्यास त्यांना चीन आणि जपानविऊद्धच्या अंतिम दोन साखळी सामन्यांपूर्वी झेप घेण्याच्या दृष्टीने मदत होईल. गुणतालिकेत जपान कोरियाच्या पुढे तिसऱ्या स्थानावर आहे. साखळी टप्प्यातील अव्वल चार संघ सहा संघांच्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. परंतु अपेक्षित तेवढे गोल करण्यात ते अपयशी ठरले. भारताने स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात मलेशियाचा 4-0 असा पराभव केला, तर उशिरा केलेल्या गोलमुळे दक्षिण कोरियावर 3-2 असा निसटत्या फरकाने विजय मिळवला. प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात भारतीय खेळाडू खूप घाईने वावरले आणि मिळालेल्या संधी त्यांनी वाया घालविल्या. ही वस्तुस्थिती मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी मान्य केली आहे.
‘आम्ही आणखी गोल करू शकलो असतो. आम्ही घाई केली आणि योग्य संधीची प्रतीक्षा केली नाही’, असे हरेंद्र मंगळवारच्या सामन्यानंतर म्हणाले. आम्ही सामन्याच्या क्लिपिंग्ज पाहू आणि आम्ही कुठे चुकलो याचे विश्लेषण करू तसेच लहानसहान बाबींवर काम करू, असे त्यांनी सांगितले. हरेंद्र यांच्यासाठी चिंतेचे कारण ठरणारा आणखी एक घटक म्हणजे संघाची पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीत खराब राहिलेली कामगिरी.
मलेशियाविऊद्ध भारताने तब्बल 11 पेनल्टी कॉर्नर मिळवले, परंतु केवळ तीन पेनल्टी कॉर्नर्सचा ते लाभ उठवू शकले आणि तेही अप्रत्यक्ष पद्धतीने. हे पुरेसे नाही म्हणून की काय, भारत मंगळवारी कोरियाविऊद्ध मिळविलेल्या 8 पेनल्टी कॉर्नर्सचा लाभ उठविण्यात अपयशी ठरला. फॉरवर्ड संगीता कुमारी आणि दीपिका यांची कामगिरी ही भारतासाठी झळाळती बाजू राहिली आहे. दोघींनीही प्रत्येकी तीन गोल केले आहे. असे असले, तरी शर्मिला देवी, प्रीती दुबे व इतरांनी अधिक जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. कर्णधार सलीमा टेटे आणि उपकर्णधार नवनीत कौर यांनीही मिडफिल्डमध्ये अधिक प्रभावी कामगिरी करणे गरजेचे आहे. आज विजय मिळविल्यास चीन आणि जपानविऊद्धच्या कठीण लढतींपूर्वी उपांत्य फेरीतील भारताचे स्थान जवळजवळ निश्चित होईल.