भारतीय महिला पुन्हा ‘क्लीन स्वीप’च्या तयारीत
झिम्बाब्वेविरुद्ध तिसरी वनडे लढत आज, झिम्बाब्वे गोलंदाजांसमोर भारताच्या भक्कम फलंदाजीला रोखण्याचे आव्हान
वृत्तसंस्था, वडोदरा : झिम्बाब्वेविऊद्धच्या महिला एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाचे लक्ष्य आता ‘क्लीन स्वीप’वर आहे. वडोदरा येथे आज बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघ आणखी एका दणदणीत विजयासह या मालिकेचा समारोप करण्यास उत्सुक आहे.
पहिल्या दोन सामन्यांत एकतर्फी विजय मिळवून भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याआधी टी-20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही 3-0 असा ‘क्लीन स्वीप’ पूर्ण करण्याचे भारताचे ध्येय आहे. पहिल्या दोन सामन्यांत झिम्बाब्वेच्या संघाने भारतासमोर फारसे आव्हान उभे केले नाही. पहिल्या सामन्यात प्रतिका रावलचे नाबाद शतक आणि श्रीचरणीने घेतलेले चार बळी यांच्या जोरावर भारताने नऊ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीत कौरची 126 धावांची खेळी आणि दीप्ती शर्माचे नाबाद 106 धावांचे योगदान यांच्या बळावर भारताने 6 बाद 328 धावांचा डोंगर उभारला.
दुसऱ्या सामन्यात युवा डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा डाव 207 धावांत गुंडाळला आणि 121 धावांनी मोठा विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. स्मृती मानधनाने पूर्णवेळ कर्णधारपदाची सुऊवात दमदारपणे केली असली, तरी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात तिला एका मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. पहिल्या सामन्यात ती 32 धावांवर बाद झाली होती, तर दुसऱ्या सामन्यात तिला खातेही उघडता आले नव्हते.
दुसरीकडे, पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात 61 धावांची प्रभावी खेळी साकारून प्रतिका रावलने सलामीवीर म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या शेफाली वर्मानेही आपली भूमिका चोख बजावली असून पहिल्या सामन्यात तिने अवघ्या 33 चेंडूंत नाबाद 64 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. मात्र हरमनप्रीत कौरचे फॉर्ममध्ये परतणे ही भारतीय संघासाठी सर्वांत सकारात्मक बाब ठरली आहे. या अनुभवी फलंदाजाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
गोलंदाजी विभागाने आपली जबाबदारी चोख बजावली आहे, परंतु झिम्बाब्वेसारख्या तुलनेने कमकुवत संघाविऊद्ध त्याहून अधिक आक्रमक कामगिरी करणे शक्य होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीचरणीने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 23 धावांत 4 बळी मिळवले, तर दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू वैष्णवी शर्माने चार बळी घेतलेण् याशिवाय दीप्तीनेही तीन गडी बाद केले. झिम्बाब्वेसाठी तिसरा एकदिवसीय सामना हा अधिक जोरदार लढा देण्याची शेवटची संधी असेल. भारताच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजांना मोठ्या भागीदारी उभारण्यात अडचणी आल्या आहेत. दुसरीकडे, त्यांच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजीच्या भक्कम फळीला रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.
थेट प्रक्षेपण :
