भारतीय महिला आज ‘टी-20’ मालिका जिंकण्याच्या मोहिमेवर
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
भारतीय महिला संघ आज रविवारी येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेचे जेतेपद आपल्या खात्यात जमा करण्यास आणि त्यासाठी आणखी एक अष्टपैलू कामगिरी करण्यास उत्सुक असेल. सर्व क्षेत्रांतील खराब कामगिरीमुळे भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता. पण त्यातून सावरून त्यांनी पहिल्या ‘टी-20’मध्ये ऑस्ट्रेलियाला इतिहासात प्रथमच 9 गडी राखून इतक्या मोठ्या फरकाने पराभूत केले. .
एकदिवसीय सामन्यांमधील खराब कामगिरीवरून टीका सहन कराव्या लागलेल्या भारताने शुक्रवारी मैदानात नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली. त्यात युवा तितस साधूच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी पूर्वार्धात ऑस्ट्रेलियाला कोणत्याही टप्प्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. शफाली वर्मा (नाबाद 64) आणि स्मृती मानधना (54) यांनी नंतर 137 धावांची भागीदारी केली. टी-20 इतिहासातील ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारताची ही सर्वोत्तम सलामीची भागीदारी आहे. 19 वर्षीय साधूसाठी (4/17) हा सामना संस्मरणीय ठरला. तिने तीन बळी पॉवरप्लेमध्ये मिळवून ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरू केली, तर फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि श्रेयंका पाटील यांनीही या युवा वेगवान गोलंदाजाला साथ देताना प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारतीय संघाने आपले क्षेत्ररक्षण सुधारून अनेक धावा वाचविल्या. खास करून झेल पकडण्याच्या बाबतीत सुधारित कामगिरीचे दर्शन घडविण्यात येऊन खुद्द कर्णधार हरमनप्रीत कौरने मिळालेल्या संधी सोडल्या नाहीत. तितसने देखील अॅश्ले गार्डनरचा फॉलो थ्रूवर झेल घेऊन आपला चौथा बळी मिळविला. प्रत्येक सामन्याच्या किंवा प्रत्येक चांगल्या कामगिरीच्या मागे तासन्तास घेतलेले कठोर परिश्रम असतात, असे तितसने सामन्यानंतर माध्यमांना सांगितले.
परंतु भारताला मालिकेचे जेतेपद मिळविण्यासाठी सातत्य दाखवावे लागेल आणि त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या प्रतिकारावरही लक्ष ठेवावे लागेल. कारण पाहुण्या संघाला उसळी घेण्याची सवय आहे. शिवाय दिग्गज एलिस पेरीचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना राहणार असल्याने विजय मिळवून हा क्षण साजरा करण्याचा त्यांचा निर्धार असेल. रविवारच्या सामन्यासाठी मी खरोखर उत्सुक आहे. एलिस पेरीचा आनंद साजरा करण्याची ही एक उत्तम संधी आहे, असे ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने म्हटले आहे.
संघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तितस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.
ऑस्ट्रेलिया : अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, अॅलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.