For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांना ‘टी-20’ मालिका जिंकण्याची आज संधी

06:58 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांना ‘टी 20’ मालिका जिंकण्याची आज संधी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी मुंबई

Advertisement

भारतीय महिला क्रिकेट संघाला दीर्घ आणि संमिश्र मायदेशी हंगामाची समाप्ती ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका जिंकून करण्याची नामी संधी चालून आली असून आज मंगळवारी होणार असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

तीन सामन्यांची मालिका सध्या अशी 1-1 अशी बरोबरीत असल्याने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताला विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असलेल्या वर्षाची सुऊवात शैलीदार पद्धतीने करण्याची संधी आहे. भारताच्या आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 मालिका झालेल्या असून त्यापैकी चार ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या आहेत. फक्त एक मालिका भारताला जिंकता आलेली असून सदर विजयाची नोंद 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती.

Advertisement

तथापि, या मोसमाच्या सुऊवातीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविऊद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यामुळे भारत या शेवटच्या सामन्यातील संधी वाया घालवू पाहणार नाही. भारताने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला विक्रमी फरकाने म्हणजे नऊ गडी राखून पराभूत केले. परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रविवारी झालेल्या सामन्यात येथील डी. वाय. पाटील स्टेडियममधील अवघड खेळपट्टीने फलंदाजांना बहरू दिले नाही. खेळाच्या पूर्वार्धात जोरदार दव पडल्याने भारताच्या फलंदाजांना मदत झाली असली, तरी उत्तरार्धात दव गायब झाल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणे कठीण झाले.

पण भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करून आणि चांगले क्षेत्ररक्षण करून सामना शक्य तितका लांबवला. दुसऱ्या सामन्यात सहा गडी राखून पराभूत झालेल्या यजमानांसाठी कौरचा फलंदाजीतील फॉर्म हा चिंतेचा विषय राहील. भारतीय कर्णधाराला मागील 10 टी-20 डावांमध्ये अर्धशतक नोंदवता आलेले नाही. मागील 11 पैकी सात डावांमध्ये तिने एकेरी आकड्यातील धावसंख्या नोंदविलेली आहे.

अष्टपैलू दीप्ती शर्माला दुसऱ्या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना कौरचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे का, असे विचारले असता ती म्हणाली होती की, प्रत्येक खेळाडूचा दररोज चांगला दिवस असू शकत नाही. परंतु अचानक कोणासाठीही चांगला दिवस येऊ शकतो. असे नाही की, आम्ही सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही टाकण्यात आलेल्या चेंडूची गुणवत्ता पाहून त्यानुसार खेळण्याचा प्रयत्न करत आहोत, असे तिने सांगितले. दीप्तीने दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीसह एकाकी लढा दिला आणि भारतीय डावात 27 चेंडूंत 31 धावा करण्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे चारपैकी पहिले दोन बळी घेतले. आतापर्यंतच्या दोन टी-20 सामन्यांच्या खेळपट्ट्यांनी फलंदाजांना विशेषत: पहिल्या डावात जम बसवू दिलेला नाही.

संघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुकासिंह ठाकूर, तितस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.

ऑस्ट्रेलिया-अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.

Advertisement
Tags :

.