भारतीय महिला आयर्लंडविरुद्ध ‘क्लीन स्वीप’च्या तयारीत
वृत्तसंस्था/ राजकोट
आज बुधवारी येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात आयर्लंडविऊद्धच्या महिलांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप पूर्ण करण्याची संधी भारताला मिळेल. मागील दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवले आहेत. आणखी एका दमदार फलंदाजीच्या कामगिरीसह भारतीय संघ पुन्हा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल.
चार डावांत तीन अर्धशतक झळकावलेली प्रतीका रावल तिचे सुऊवातीचे पहिले शतक बनवण्यास उत्सुक असेल. कर्णधार स्मृती मानधनासोबत तिची धमाकेदार सलामीची भागीदारी हे मालिकेतील भारतीय कामगिरीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्या राहिले आहे. या जोडीने मागील सामन्यात पहिल्या यष्टीसाठी 156 धावांची भागीदारी केली. पाच डावांमधील ही त्यांची तिसरी शतकी भागीदारी होती. मानधनाचे आघाडीला सातत्य हा भारतासाठी एक प्रमुख आधार राहिला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपासून या डावखुऱ्या फलंदाजाने सर्व स्वरूपांत तिचा फॉर्म कायम ठेवला आहे.
मागील सामन्यात सुऊवातीला गतीसाठी संघर्ष केलेल्या हरलीन देओलला डावाच्या शेवटी लय मिळाली आणि तिने 89 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनेही आधी संयम दाखवला आणि नंतर डावाच्या शेवटच्या टप्प्यात वेग वाढवला. त्यामुळे भारताला गेल्या सामन्यात 5 बाद 370 ही त्यांची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या नोंदविता आली. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत तिला चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. 34 धावांवर असताना जीवदान मिळाल्यानंतर रॉड्रिग्जने परिपक्वता दाखवली आणि तिला तिचे दुसरे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 28 चेंडू लागले.
अनुभवी फलंदाज तेजल हसनबिसनेही पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावून चांगले पुनरागमन केले. शफाली वर्मा आणि कौर यासारख्या फटकेबाज फलंदाजांच्या अनुपस्थितीत या मालिकेत उदयोन्मुख खेळाडूंवर भर देण्यात आला असून प्रतीकाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे.
भारताच्या गोलंदाजीमुळे मात्र काही चिंता निर्माण झाल्या आहेत, कारण घरच्या मैदानावर खेळत असूनही संघाला सातत्याने बळी घेण्यात अडचणी येत आहेत. 371 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडला 7 बाद 254 पर्यंत मजल मारता आली. भारताला रेणुका सिंहची कमतरता भासत असताना पूजा वस्त्रकारच्या दुखापतीमुळे त्यांची समस्या आणखी वाढली आहे. गेल्या सामन्यात 100 वा एकदिवसीय सामना खेळलेली दीप्ती शर्मा 19.50 च्या सरासरीने चार बळी घेऊन सर्वोत्तम गोलंदाज ठरली आहे, तर प्रिया मिश्रा, सायली सतघरे, तितस साधू यांना प्रभाव पाडता आलेला नाही.
आयर्लंडची फलंदाजी मुख्यत्वे कर्णधार गॅबी लुईस, क्रिस्तिना कुल्टर-रेली आणि लीह पॉल या त्रिकुटाभोवती फिरत आहे, ज्यांनी अर्धशतक झळकावलेले आहे. तथापि आयर्लंडसाठी क्षेत्ररक्षण हे चिंतेचे कारण आहे. कारण संघाने अनावश्यक धावा दिल्या आहेत.
सामन्याची वेळ : सकाळी 11 वा.