For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्लीन स्वीप साधण्यावर भारतीय महिलांचे लक्ष

06:38 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्लीन स्वीप साधण्यावर भारतीय महिलांचे लक्ष
Advertisement

बांगलादेश महिलांविरुद्ध पाचवा व शेवटचा टी-20 सामना आज

Advertisement

वृत्तसंस्था/ सिल्हेट, बांगलादेश

यजमान बांगलादेशविरुद्ध भारतीय महिला संघाचा पाचवा व शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज गुरुवारी होत असून पाच सामन्यांची ही मालिका एकतर्फी जिंकण्याचा भारताचा इरादा असेल. हा डे-नाईट सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे.

Advertisement

पावसाच्या व्यत्यय आलेल्या या मालिकेतील चारपैकी दोन सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत बांगलादेशच्या फलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजविले. दोन सामन्यात मात्र पावसाचा व्यत्यय आला होता. दुसऱ्या सामन्यात 5.2 षटकांत केवळ 29 धावा जमविण्याची गरज होती आणि भारताने त्याहून कमी षटकांत विजयाचे उद्दिष्ट गाठले. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत भारताने फक्त एक अर्धशतक नोंदवले असून शेफाली वर्माने (51) पहिल्या सामन्यात ते नोंदवले होते. स्मृती मानधनाने सर्वाधिका 47 तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 39 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे.

येत्या ऑक्टोबर महिलांची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा बांगलादेशमध्येच होणार असल्याने भारतीय महिलांना वैयक्तिक मोठे योगदान देता आलेले नाही. त्यामुळे स्मृती व हरमनप्रीत गुरुवारच्या सामन्यात ही संधी साधण्याचा प्रयत्न करतील. सोमवारच्या सामन्यात हरमनप्रीतने 26 चेंडूत 39 धावा फटकावल्या होत्या, हाच जोम ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. 14 षटकांचा हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 56 धावांनी जिंकला होता. शेफाली वर्माने आतापर्यंत 84 धावा जमविल्या असल्या तरी तिच्या खेळात सातत्य नाही. मानधनाने 83 तर कौरने 75 धावा जमविल्या आहेत. या मालिकेतून जास्तीत जास्त धडे घेण्याची भारतीय संघाला गुरुवारी शेवटची संधी असणार आहे, विशेषत: खेळपट्ट्या व वातावरणाबाबत.

बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकवल्यानंतर तिचा फॉर्म खालावला असून तिने चार सामन्यात 86 धावा काढल्या आहेत. मात्र संघाचे भवितव्य पुन्हा एकदा तिच्या कामगिरीवरच अवलंबून असेल. संथ खेळपट्यांवर भारतीय गोलंदाजांनी मात्र चमकदार प्रदर्शन केले आहे. डावखुरी स्पिनर राधा यादव यात आघाडीवर असून तिने 7 बळी मिळविले आहेत. पाच बळी घेत पूजा वस्त्रकारने, 4 बळी घेत रेणुका सिंगने, 4 बळी घेत ऑफस्पिनर श्रेयांका पाटीलने तिला चांगली साथ दिली आहे. अनुभवी दीप्ती शर्मानेही पाच बळी टिपले आहेत.

गोलंदाजीच्या तक्त्यात बांगलादेशची रबिया खान दुसऱ्या स्थानावर असून चार सामन्यात तिने 6 बळी टिपले आहेत. 19 वर्षीय वेगवान गोलंदाज मारुफा अक्तरनेही प्रभावी मारा केला असून तिने चार सामन्यात 5 बळी घेतले आहेत. भारताच्या अनुभवी माऱ्याला सामोरे जाण्यासाठी सुलतानावर बांगलादेशची मुख्य भिस्त असेल. मात्र तिला दिलारा अक्तर, मुर्शिदा खातून यांची तिला साथ मिळण्याची गरज आहे. बांगलादेशने टी-20 सामन्यात 2023 मध्ये शेवटचा विजय मिरपूर येथे मिळविला होता आणि सुलताना त्या संघाची सदस्य होती.

Advertisement
Tags :

.