भारतीय महिलांचे लक्ष सलग दुसऱ्या जेतेपदावर
वृत्तसंस्था / कौलालंपूर
आयसीसीच्या 19 वर्षांखालील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे विद्यमान विजेता भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता प्रारंभ होईल. भारतीय कनिष्ठ युवा महिला संघाचे लक्ष सलग दुसऱ्या जेतेपदावर राहिल.
निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय कनिष्ठ युवा महिला संघाने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत सर्व म्हणजे सहाही सामने जिंकले आहेत. भारताने विंडीजचा 9 गड्यांनी, मलेशियाचा 10 गड्यांनी, लंकेचा 60 धावांनी, बांगलादेशचा 8 गड्यांनी, स्कॉटलंडचा 150 धावांनी आणि उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केले आहेत. भारतीय संघातील सलामीची फलंदाज त्रिशा गोंगाडी हिची फलंदाजी चांगलीच बहरत आहे. तिने या स्पर्धेत आतापर्यंत सहा डावांत 66.25 धावांच्या सरासरीने 265 धावा जमविल्या. तसेच तिने या स्पर्धेत आपले पहिले शतकही झळकविले आहे. त्रिशाची सलामीची साथीदार कमलिनी हिने 6 डावांमध्ये 135 धावा जमविल्या आहेत. मात्र भारताच्या मधल्याफळीतील फलंदाज अद्याप समाधानकारक कामगिरी करु शकलेले नाहीत. गोलंदाजीमध्ये वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला यांची कामगिरी दर्जेदार झाली आहे. वैष्णवीने या स्पर्धेत आतापर्यंत 15 तर आयुषीने 12 गडी बाद केले आहेत. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यातील खेळपट्टी फिरकीला अनुकल ठरली तर या दोन्ही गोलंदाजांतील कामगिरी निर्णायक ठरु शकेल. या स्पर्धेत प्रथमच द. आफ्रिकेचा युवा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठत आहे. द. आफ्रिकेने उपांत्य सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. मात्र भारतीय कनिष्ठ महिला संघाची आतापर्यंतची या स्पर्धेतील कामगिरी दर्जेदार झाली असली तरी द. आफ्रिकेला कमी लेखण्याची चूक निश्चितच भारतीय संघ करणार नाही. द. आफ्रिका संघाचे नेतृत्व कायला रिनेकी करत आहे.