जपानला हरवून भारतीय महिला अंतिम फेरीत दाखल
वृत्तसंस्था/ राजगिर, बिहार
विद्यमान विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने आपली अपराजित घोडदौड कायम राखताना महिलांच्या आशियाई चॅम्पियनस ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे चीनने मलेशियाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
भारतातर्फे उपकर्णधार नवनीत कौरने 48 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर तर लालरेमसियामीने 56 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. भारताने या सामन्यातही पूर्ण वर्चस्व राखत भरपूर संधी मिळविल्या. त्यांनी एकूण 13 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. बुधवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताची लढत चीनविरुद्ध होईल. त्याआधी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात चीनने मलेशियावर 3-1 अशी मात केली. मलेशिया व जपान यांच्यात तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी लढत होईल तर कोरियाने थायलंडचा 3-0 असा पराभव करून पाचवे स्थान निश्चित केले.
भारतीय महिलांनी आक्रमक धोरण कायम ठेवत प्रारंभापासून जपानवर चढाया करीत त्यांच्या बचावफळीला दबावाखाली ठेवले. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातही भारताने त्यांच्याविरुद्ध हेच धोरण अवलंबले होते. या सामन्यात जपानच्या हद्दीतच जास्त वेळ खेळ चालला होता, त्यामुळे भारतीय बचावफळीची फारशी कसोटीच लागली नाही. पहिल्या पाच मिनिटात भारताला गोलच्या दिशेने पहिली संधी मिळाली. पण कर्णधार सलिमा टेटेचा प्रयत्न जपानची गोलरक्षक यु कुडोने फोल ठरविला.
भारतीयांनी वारंवार जपानच्या गोलक्षेत्रात चढाया करीत दोन मिनिटात दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. सावध कुडोने नवनीत कौर व दीपिकाच प्रयत्न वाया घालविले. दुसऱ्या सत्रातील तिसऱ्या मिनिटाला भारताने तीन लागोपाठ पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, पण त्यावर गोल नोंदवण्यात अपयश आले. 21 व्या मिनिटाला आणखी पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण कुडोने अप्रतिम गोलरक्षण करीत दीपिकाचा प्रयत्न फोल ठरविला. 24 व 25 व्या मिनिटाला भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण त्याचाही भारताला लाभ घेता आला नाही.
उत्तरार्धात सुरुवातीलाच दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले, पण तेही वाया गेले. 35 व्या मिनिटाला कुडोने पुन्हा एकदा दीपिकाचा फटका अचूक थोपविला. 41 व्या मिनिटाला दीपिकाने जपानच्या सर्कलमध्ये चेंडू हिसकावून घेतला, पण तिने मारलेला फटका वाईड केला. तिसरे सत्र संपण्यास काही सेकंद असताना कुडोने आणखी एकदा गोलरक्षण करीत उदिताचा प्रयत्न फोल ठरविला. 47 व्या मिनिटाला भारताला 12 वा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण कुडोने पुन्हा तो फोल ठरविला. पुढच्या मिनिटाला मात्र भारताने गोलकोंडी फोडत पहिला गोल नोंदवला. दीपिकाने मिळविलेल्या पेनल्टी स्ट्रोकवर नवनीतने कोणतीही चूक केली नाही.
या गोलने उत्साहित झालेल्या भारताने 56 व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल नेंदवत आघाडी वाढविली. उजव्या बगलेतून सुनेलिता टोपोने चेंडूसह आगेकूच करीत लालरेमसियामीला चेंडू पुरविल्यानंतर तिने तो अचूक गोलपोस्टमध्ये मारला. जपानला अंतिम क्षणात पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताच्या भक्कम बचावाला ते भेदू शकले नाहीत.