For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा चीनकडून पराभव

06:29 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा चीनकडून पराभव
Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

भारतीय महिला हॉकी संघाला चीनविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यात पुन्हा एकदा अपयश आले. येथे झालेल्या हॉकी प्रो लीग स्पर्धेतील सामन्यात भारताला चीनच्या महिलांकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. वंदना कटारियाने या सामन्यातील पहिला गोल 15 व्या मिनिटाला नोंदवला. पण नंतर वेन डॅन (40 वे मिनिट), बिंगफेंग जू (52 वे मिनिट) यांनी एकेक गोल नोंदवून चीनचा विजय निश्चित केला. गेल्या वर्षी झालेल्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही चीनने भारताला 5-1 असे हरविले होते. त्याच स्पर्धेत उपांत्य फेरीतही चीनने 4-0 असा विजय मिळविला होता. सामन्याच्या सुरुवातीला भारताने जलद पासेस देत वर्चस्व राखले होते. मात्र त्यांना गोलची संधी मिळविता आली नाही. पहिल्या सत्रात चीनला गोल करण्याची पहिली संधी मिळाली. भारतीय गोलरक्षक सविताने चेंडू क्लीअर करण्यात चूक केली. पण चीनला त्याचा लाभ उठवता आला नाही. पहिले सत्र संपण्याच्या सुमारास चीनच्या हुआ लियूला सुवर्णसंधी चालून आली होती. पण तिने मारलेला रिव्हर्स फ्लिक गोलपोस्टच्या खूप दूरवरून बाहेर गेला. सत्र संपण्यास काही क्षण बाकी असताना वंदनाने लालरेमसियामीचा क्रॉसला गोलच्या दिशेने डिफ्लेक्ट करीत भारताला आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रात चीनने आक्रमण तेज करीत पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण बिच्छू देवी खरिबम व इशिका चौधरी यांनी तो फोल ठरविला. चीनच्या अनेक चढाया भारतीय बचावपटूंनी रोखल्या. पण या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मध्यंतरानंतर संगीता कुमारीने बेसलाईनजवळून धोकादायक चाल रचली होती. पण तिला फटका घेण्यास एकही सहकारी जवळपास नसल्याने तिचा हा प्रयत्न वाया गेला. तिसरे सत्र संपण्यास 5 मिनिटे असताना चीनच्या जियाकी झाँगने भारताच्या दोन बचावपटूंना गुंगारा देत आगेकूच केली आणि वेन डॅनकडे चेंडू सोपविला. तिने सविताच्या वरून चेंडू फटकावत चीनला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या सत्रात चीनने आक्रमण आणखी तेज करीत भारताला बचावावर भर देण्यास भाग पाडले. चारवेळा फटके कॉर्नरचे फटके मारल्यानंतर रिबाऊंड झालेल्या चेंडूला बिंगफेंगने चापटी मारत गोलची दिशा दिली. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. भारताने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. चिनी बचावपटूंनी त्यांना यश मिळू दिले नाही. चीननेही काही पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण सविताने उत्तम गोलरक्षण करीत ते फोल ठरविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.