भारतीय महिलांची बांगलादेशवर मात
यू-19 महिला आशिया चषक
वृत्तसंस्था/कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या यू-19 महिलांच्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत भारताच्या यू-19 महिला संघाने चमकदार प्रदर्शन करीत बांगलादेश यू-19 महिला संघावर 8 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. भारताने क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश महिला संघाला 20 षटकांत 8 बाद 80 धावांवर रोखले. फहोमिदा छोया (10), मोसम्मत इव्हा (14), निशिता अक्तर निशी (10) व हबिबा इस्लाम (नाबाद 11) या चौघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी भेदक मारा केला. पण आयुषी शुक्लाने केवळ 9 धावा देत बांगलादेशचे 3 गडी बाद केले. याशिवाय सोनम यादवने 6 धावांत 2 तर शबनम शकील व मिथिला विनोद यांनी एकेक बळी टिपले. त्यानंतर हे माफक आव्हान भारतीय युवा महिला संघाने 13 व्या षटकांत गाठले. 12.1 षटकांत 2 बाद 86 धावा जमवित सहज विजय साकार केला. सलामीच्या गोंगादी त्रिशाने 46 चेंडूत नाबाद 58 तर निकी प्रसादने नाबाद 22 धावा केल्या. कमलिनी शून्यावर तर सानिका चाळके 1 धाव काढून बाद झाली. अनिसा अक्तर सोबाने 19 धावांत भारताचे दोन्ही बळी मिळविले.
बांगलादेश यू-19 महिला संघ 20 षटकांत 8 बाद 80 : मोसम्मत इव्हा 14, हबिबा इस्लाम नाबाद 11, अवांतर 11, आयुषी शुक्ला 3-9, सोनम यादव 2-6. भारत यू-19 महिला संघ 12.1 षटकांत 2 बाद 86 : गोंगादी त्रिशा 46 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 58, निकी प्रसाद 14 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 22, अवांतर 5, अनिसा अक्तर सोबा 2-19.