भारतीय महिलेला युएईमध्ये ठोठावली फाशीची शिक्षा
केंद्र सरकारची न्यायालयात माहिती : 4 महिन्यांच्या बाळाच्या हत्येचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, दुबई
चार महिन्यांच्या बाळाच्या कथित हत्येप्रकरणी अबू धाबीमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय महिला शहजादी खानला 15 फेब्रुवारी रोजी युएईमध्ये फाशी देण्यात आली. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या शहजादी खानला 15 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) फाशी देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी सांगितले. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी ही घटना ‘अत्यंत दुर्दैवी’ असल्याचे म्हटले आहे. आता 5 मार्च रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही समजते.
युएईमधील भारतीय दुतावासाला 28 फेब्रुवारी 2025 रोजी युएई सरकारकडून अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार शहजादी खानला सुनावण्यात आलेली मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी 15 फेब्रुवारी 2025 रोजी युएईच्या कायदे आणि नियमांनुसार अंमलात आणण्यात आली, असे कळविण्यात आले आहे. यासंबंधी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तिच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली होती. यावरील सुनावणीवेळी ‘हे प्रकरण आता संपले आहे. 15 फेब्रुवारी रोजी शहजादीला फाशी देण्यात आली. त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया 5 मार्च रोजी होईल’, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले. याप्रसंगी 14 फेब्रुवारी रोजी शहजादीने तुरुंगातून आपल्या कुटुंबियांना फोन करत ‘मला एक-दोन दिवसांत फाशी दिली जाऊ शकते, हा माझा शेवटचा फोन असू शकतो.’ अशी माहिती दिल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबाला तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
उत्तर प्रदेशातील बांदा जिह्यातील रहिवासी असलेले शहजादीचे वडील शब्बीर खान यांनी आपल्या मुलीच्या प्रकृतीबद्दल माहिती मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारकडून त्यांना स्पष्ट माहिती मिळत नव्हती. परराष्ट्र मंत्रालयाशी वारंवार संपर्क साधूनही त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्यामुळे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
बाळाच्या हत्या प्रकरणात 10 फेब्रुवारी 2023 रोजी शहजादीला अबू धाबी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर 31 जुलै 2023 रोजी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर तिला अल वाथबा तुरुंगात कैद करण्यात आले होते.