For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणच्या ताब्यातील भारतीय महिला परतली मायदेशी

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराणच्या ताब्यातील भारतीय महिला परतली मायदेशी
Advertisement

इराणकडून इस्रायलच्या जहाजावर ताबा : भारतीय मुत्सद्देगिरीला मिळाले यश

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

इराणकडून कब्जा करण्यात आलेल्या मालवाहू जहाजावरील चालक दलाच्या भारतीय सदस्यांपैकी एक महिला भारतात परतली आहे. केरळच्या त्रिशूर येथील रहिवासी एन. टेसा जोसेफला सुरक्षित मायदेशी आणले गेले आहे. मोदींची गॅरंटी विदेशातही पूर्ण होते असे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी याप्रकरणी काढले आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावास संबंधित मालवाहू जहाजावरील उर्वरित 16 भारतीयांच्या संपर्कात आहे. भारतात परतलेली महिला कर्मचारी तंदुरुस्त आणि भारतातील स्वत:च्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांच्या सहकार्याद्वारे या महिलेला मायदेशी परत येण्याची सुविधा पुरविण्यात आली. उर्वरित 16 भारतीयांची वापसी सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दूतावास इराण सरकारच्या संपर्कात असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जायसवाल यांनी सांगितले आहे. मालवाहू जहाजावरील सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. फारसच्या आखातात हवामान अनुकूल नव्हते. हवामान अनुकूल झाल्यावर जहाजावरील सर्व भारतीयांना मायदेशी आणले जाईल अशी माहिती भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी सांगितले होते.

Advertisement

इराणकडून जहाजावर कब्जा

इराणने 13 एप्रिल रोजी इस्रायलशी निगडित जहाजावर कब्जा केला होता. या जहाजावर इराण रिव्हॉल्युशनरी गार्डच्या कमांडोंनी हेलिकॉप्टरद्वारे धाव घेतली होती. तसेच हे जहाज इराणच्या सागरी हद्दीत नेले होते. या जहाजाचे संचालन एका इस्रायली उद्योजकाच्या ताब्यात होते. या जहाजातून इस्रायलला विदेशातून मदत पाठविली जाऊ शकते असा संशय व्यक्त करत इराणने हे जहाज स्वत:च्या ताब्यात घेतले आहे.

इराणच्या मंत्र्याची जयशंकर यांच्याशी चर्चा

इराणने कब्जा केलेल्या जहाजाच्या चालक दलामध्ये एकूण 25 सदस्य होते, यात भारतीयांचाही समावेश होता. इराणने होर्मूझ सामुद्रधुनीत या जहाजावर कब्जा केला होता. याप्रकरणी विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी चार दिवसांपूर्वी इराणचे विदेशमंत्री अमीर अब्दुल्लाहियन यांच्याशी चर्चा केली होती.

Advertisement
Tags :

.